Fri, Aug 23, 2019 23:13होमपेज › Aurangabad › ३६ फरार आरोपींच्या संपत्तीवर येणार टाच

३६ फरार आरोपींच्या संपत्तीवर येणार टाच

Published On: Jan 11 2018 1:38AM | Last Updated: Jan 11 2018 1:36AM

बुकमार्क करा
औरंगाबाद : प्रतिनिधी

गुन्हा केल्यापासून पसार झालेले आरोपी न सापडल्यास त्यांना फरार घोषित करून त्यांची संपत्ती जप्त करण्याची कायदेशीर कारवाई पोलिसांना करता येते. पोलिस आयुक्‍तालयातील अशा 36 आरोपींच्या मालमत्तेवर टाच आणण्यासाठी न्यायालयात प्रस्ताव पाठविण्यात आला असून एकूण फरार आरोपींची संख्या 132 आहे, अशी माहिती पोलिस आयुक्‍त यशस्वी यादव यांनी बुधवारी (दि. 10) पत्रकारांना दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, गुन्हा केल्यानंतर आरोपी पसार होतात. तपास अधिकारी आरोपींचा सर्वत्र शोध घेतात. मात्र, अनेक प्रयत्न करूनही आरोपी हाती लागत नाहीत. विशिष्ट कालावधी उलटल्यानंतर पोलिस संबंधित आरोपींना फरार घोषित करतात. आरोपी जर कुख्यात असेल तर त्याची माहिती देणार्‍या बक्षीसही जाहीर केले जाते. अखेर आरोपीला फरार घोषित केले जाते. अशा फरार आरोपींची संख्या 132 आहे. यात परिमंडळ एकचे 66 आणि परिमंडळ दोनचे 66 आरोपी आहेत. सीआरपीसी कलम 82 नुसार न्यायालयात तसा प्रस्तावही पाठविण्यात आलेला आहे. तसेच, यापैकी 36 आरोपींच्या संपत्तीवर टाच आणण्यासाठीही पोलिसांनी न्यायालयात प्रस्ताव दाखल केला आहे. विशेष म्हणजे, आजपर्यंत शहर पोलिसांनी अशी कारवाई केली नाही. फरार आरोपींची संख्या वाढत असल्याने सीआरपीसी कलम 82 नुसार फरार घोषित करण्याचे आणि कलम 83 नुसार त्यांची संपत्ती जप्त करण्याची कारवाई पोलिसांनी सुरू केली आहे, असेही पोलिस आयुक्‍त यशस्वी यादव यांनी कळविले.