Wed, Nov 13, 2019 13:09होमपेज › Aurangabad › पतीच्या त्रासाला कंटाळून ‘ती’ गेली रेल्वे रुळावर

पतीच्या त्रासाला कंटाळून ‘ती’ गेली रेल्वे रुळावर

Published On: May 19 2018 9:26PM | Last Updated: May 19 2018 3:26PM औरंगाबाद : प्रतिनिधी

चारित्र्यावर संशय घेऊन नवरा सतत मारहाण करीत असल्याने आयुष्याला कंटाळलेल्या एका महिलेने आत्महत्त्या करण्यासाठी रेल्वे रुळावर ठाण मांडले. विशेष पोलिस अधिकारी श्रीमंत गोर्डे यांनी या महिलेला आत्महत्त्येपासून प्रवृत्त करून घरी सुखरुप पोहोचवले. संग्रामनगर रेल्वे गेटवर शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता हा प्रकार घडला.

श्रीमंत गोर्डे हे आपले दुकान बंद करून घरी जात असताना रात्री साडेअकराच्या सुमारास एक महिला आत्महत्त्या करण्याच्या उद्देशाने रेल्वे रुळावर बसल्याचे दिसले. शंका आल्याने गोर्डे यांनी तिकडे धाव घेऊन महिलेला बोलते केले असता, तिने आपली कहाणी सांगितली. रेखा आप्पासाहेब घोरपडे (वय 37, धंदा - मजुरी, रा. गोलटगाव), असे या महिलेचे नाव आहे. पती आप्पासाहेब बाळाजी घोरपडे हा चारित्र्यावर संशय घेऊन सतत मारहाण करीत असतो. संसाराचा गाडा चालविण्यासाठी मोलमजुरीशिवाय माझ्याकडे पर्याय नाही. मी जिथे कामाला जात असे, त्या ठिकाणी येऊन पती संशयाने बघत असतो. संसारात कसलाही हातभार तो लावत नसल्याने मजुरीकडून अश्‍विनी ( इयत्ता 6 वी), कावेरी ( इयत्ता 4 थी) आणि पायल ( इयत्ता पहिली) या तीन मुलींच्या शिक्षणासह सर्व खर्च मीच करते. एवढे करूनही पती सतत मानसिक त्रास देत असल्याने मी गोलगावहून औरंगाबाद गाठले, असे रेखा घोरपडे यांनी सांगितले.

औरंगाबादेत गादिया विहार भागात रेखा यांचे माहेर आहे. माहेरी आल्यानंतर आई बबनबाई शिंदे यांना त्यांनी सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर रात्री आई झोपल्याची खात्री करून संग्रामनगर रेल्वे पटरी गाठली. त्याच वेळी गोर्डे पाटील यांनी समुपदेशन करून आत्महत्त्या करण्यापासून परावृत्त केले. शिवाजीनगर चौकीचे पोलिस कॉन्स्टेबल दत्ता बोटखे, अ‍ॅड, रामदास भोसले, विलास सोनवणे, राहुल सोनकांबळे यांनी महिलेची समजूत घालून घरी सुखरुप पोहोचविले.