Sat, Apr 20, 2019 15:52होमपेज › Aurangabad › पोलिसांना ‘गनिमी कावा’ची भीती

पोलिसांना ‘गनिमी कावा’ची भीती

Published On: Aug 09 2018 1:35AM | Last Updated: Aug 09 2018 1:35AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी 9 ऑगस्ट रोजी क्रांतिदिनी पुकारलेला ‘महाराष्ट्र बंद’ शांततेत पार पाडण्यासाठी औरंगाबाद पोलिसांनी जोरदार तयारी केली आहे. शहर आणि ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यात तगडा बंदोबस्त तैनात केला असून गुप्तचरांच्या अहवालानुसार आंदोलक गनिमी कावा करण्याच्या तयारीत असल्याने पोलिसांनी शस्त्रांवरील धूळ साफ करीत सज्ज असल्याचे दाखवून दिले आहे. 

आतापर्यंत शहरात निघालेले सर्व मोर्चे, आंदोलने शांततेत पार पडल्यामुळे यापुढेही मराठा संघटनांनी पुकारलेला बंद शांततेतच पार पडेल, असा विश्‍वास पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांनी व्यक्त केला. दरम्यान, गुप्तचर यंत्रणांनी या बंदबाबत अहवाल सादर केला असून आंदोलक गनिमी कावा करण्याच्या तयारीत आहेत, अशी खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे पोलिसांनीही तयारी केली आहे. सर्व ठाण्यांतील पोलिसांना शस्त्रांसह सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय ग्रामीण पोलिसांनीही शस्त्रांवरील धूळ झटकली असून बुधवारी शस्त्रांची सर्व्हिसिंग करण्यात आली. 

शहरात तीन हजारांपेक्षा जास्त बंदोबस्त

मराठा संघटनांनी पुकारलेला बंद शांततेत पार पडावा यासाठी शहर पोलिसांनी जोरदार तयारी केली आहे. 1 डीसीपी, 6 एसीपी, 25 पोलिस निरीक्षक, 120 पोलिस उपनिरीक्षक आणि सहायक पोलिस निरीक्षक, राज्य राखीव पोलिस दलाच्या चार कंपन्या, केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या 10 कंपन्या, क्यूआरटीची दोन पथके, 30 स्ट्रायकिंग फोर्स, 2500 पोलिस कर्मचारी, 300 होमगार्ड शहरात तैनात आहेत. वॉच टॉवर तयार केले असून सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचीही नजर राहणार आहे.

जिल्ह्यात अडीच हजार पोलिस

औरंगाबाद जिल्ह्याची हद्द मोठी आहे. त्या तुलनेत कर्मचारी संख्या अपुरी पडत असल्याने बाहेर जिल्ह्यांतून मोठा बंदोबस्त मागवून घेण्यात आला आहे. बंददरम्यान जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह या स्वतः देखरेख ठेवणार आहेत. जिल्ह्यात 1500 पोलिस कर्मचारी, 450 होमगार्ड, 134 अधिकारी, राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) दोन कंपन्या, असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याशिवाय राखीव बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.