Mon, Mar 25, 2019 13:14होमपेज › Aurangabad › ...तर काकासाहेबचे प्राण वाचले असते !

...तर काकासाहेबचे प्राण वाचले असते !

Published On: Jul 24 2018 12:49PM | Last Updated: Jul 24 2018 12:50PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

‘मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय झाला नाही तर सोमवारी कायगाव येथे गोदावरी नदीत उड्या घेऊन आम्ही सामूहिक जलसमाधी घेऊ’ असा इशारा सकल मराठा समाजाने रविवारीच रीतसर निवेदन देऊन दिला होता. मात्र, या इशार्‍याकडे आणि निवेदनाकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहिलेच नाही. त्यामुळे काकासाहेब शिंदे या युवकाचे प्राण गेले, हे आता स्पष्ट झाले आहे. 

मराठा आरक्षणावरून सध्या महाराष्ट्र पेटलेला आहे. ठिकठिकाणी हिंसक आणि उग्र आंदोलने होत आहेत. गंगापूर येथेही गेल्या चार दिवसांपासून मराठा क्रांती मोर्चाचे काही कार्यकर्ते या मागणीसाठी ठिय्या आंदोलन करीत होते. रविवारीच या कार्यकर्त्यांनी जर आरक्षणाबाबत शासनाने ठोस भूमिका घेतली नाही तर सोमवारी आम्ही कायगाव येथे सकाळी ठिय्या मांडू आणि दुपारी तीन वाजता गोदावरी नदीत उड्या मारून सामूहिक जलसमाधी घेऊ, असा इशारा निवेदनाद्वारे प्रशासनाला दिला होता. 

रोखण्याची व्यवस्थाच केली नाही!

मराठा क्रांती मोर्चाने दिलेल्या सामूहिक जलसमाधीच्या इशार्‍याकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहिलेच नाही. त्यामुळे कायगाव येथे हे आंदोलन रोखण्यासाठी किंवा काही दुर्घटना घडल्यास तिचा सामना करण्यासाठी प्रशासनाने कोणतीच व्यवस्था केली नव्हती. वास्तविक पाहता कायगाव येथे प्रशासनाने मोठा पोलिस बंदोबस्त ठेवणे गरजेचे होते. प्रत्यक्षात तेथे सकाळी केवळ 15 ते 20 पोलिस कर्मचारी होते. वरिष्ठ एकही अधिकारी नव्हता. प्रशासनाकडून एकही अधिकारी तिकडे फिरकला नाही. जर आंदोलकांनी गोदावरीत उड्या मारल्या तर त्यांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान आणि पाणबुडे तेथे तैनात ठेवणे गरजेचे होते. तीही व्यवस्था प्रशासनाने केली नव्हती. प्रशासनाची हीच चूक आणि हलगर्जीपणा भोवला. जर प्रशासनाने येथे मोठा पोलिस बंदोबस्त, अग्निशमनचे जवान, पाणबुडे ठेवले असते तर कदाचित आंदोलनकर्त्या काकासाहेब शिंदेचे प्राण वाचू शकले असते.