Thu, Jun 27, 2019 10:31होमपेज › Aurangabad › इच्छुक फार, पदांची मारामार

इच्छुक फार, पदांची मारामार

Published On: Feb 15 2018 5:25PM | Last Updated: Feb 15 2018 5:25PMऔरंगाबाद  : गजेंद्र बिराजदार

मराठवाड्याच्या औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद या चार जिल्ह्यांत सरकारी व अनुदानित महाविद्यालयांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांची हजारो पदे रिक्‍त आहेत. एकीकडे भरती बंद आणि दुसरीकडे पात्र उमेदवारांची वाढत चाललेली संख्या यामुळे बेरोजगारीचे संकट दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालले आहे.

चार जिल्ह्यांत 115 अनुदानित महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांत शिक्षकांची 890, तर शिक्षकेतर 652 अशी 1542 पदे रिक्‍त आहेत. विशेष म्हणजे ही पदे गेल्या सात वर्षांपासून भरली गेली नाहीत. त्यामुळे नव्याने निर्माण होणारी पदे भरण्याचा प्रश्‍नच येत नाही. या चार जिल्ह्यांत उच्च शिक्षणाशी संबंधित 10 शासकीय संस्था असून तेथेही प्राध्यापकांची45 तर लिपिकवर्गीय आणि चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांची 15 पदे रिक्‍त आहेत. या संस्थांमधील कामाचा भार पाहता तेथे प्राध्यापकांची साडेचार व लिपिकवर्गीय व चतुर्थश्रेणी अशी 65 पदे भरावी लागणार आहेत.

नेट, सेट आणि पीएच.डी. केलेले अनेक जण तासिका तत्त्वावर काम करीत आहेत. मात्र, त्याचेही मानधन दोन-दोन वर्षे मिळत नसल्यामुळे दे माय धरणी ठाय अशी त्यांची अवस्था झाली आहे. केवळ पूर्णवेळ नाही तर कंत्राटी भरतीही बंद असल्यामुळे उच्च शिक्षणात करिअर करू इच्छिणार्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

विद्यापीठात पदे रिक्‍त

विद्यापीठात प्राध्यापकांच्या 105, तर शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या 257 जागा रिक्‍त आहेत. नॅकला सामोरे जायचे असल्याच्या पार्श्‍वभूमीवर किमान शिक्षकांची पदे कंत्राटी तत्त्वावर भरता यावीत म्हणून विद्यापीठाने राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता. तथापि, भरतीवर बंदी असल्यामुळे प्रशासनाचे हे प्रयत्न निष्फळ ठरले. त्यामुळे काही जागा विद्यापीठ फंडातून कंत्राटी तत्त्वावर भरण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, ही भरतीही काही कारणांमुळे रखडली आहे. विद्यापीठात शिक्षकांची 259 मान्य पदे आहेत. त्यापैकी 154 पदे भरलेली असून 105 रिक्‍त आहेत. शिक्षकेतर कर्मचार्‍यांची मान्य पदे 777 आहेत. त्यापैकी 520 भरलेली असून 257 रिक्‍त आहेत. याशिवाय विद्यार्थी विकास संचालक, परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक, वित्त व लेखा अधिकारी, चार अधिष्ठाता आदी पदे रिक्‍त आहेत.

कंत्राटीलाही हरकत

औरंगाबादेतील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांत प्राध्यापकांची 135 पदे मंजूर आहेत. यापैकी 76 पदे भरलेली असून 59 पदे रिक्‍त आहेत. रिक्‍त पदांमुळे अध्यापनावर परिणाम होऊ नये म्हणून महाविद्यालय प्रशासन दरवर्षी 20 ते 25 प्राध्यापकांची कंत्राटी तत्त्वावर नेमणूक करत होते. तथापि, सरकारने यावर्षी कंत्राटी नेमणुकीलाही लाल निशाण दाखविल्यामुळे महाविद्यालय प्रशासन अडचणीत आले आहे. तासिका तत्त्वावर प्राध्यापकांची नेमणूक करून गाडा हाकलला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. या महाविद्यालयात शिक्षकेतर कर्मचार्‍यांचीही 15 पदे रिक्‍त आहेत. शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातही अशीच बोंब आहे.

रोष वाढतोय - पाईकराव 

एकेकाळी सरकारने अपात्र लोकांना नोकरीत कायम केले. आता पात्र उमेदवार असूनही त्यांना नोकरी दिली जात नाही. हा अन्याय आहे. सरकारने रिक्‍त जागा भरल्या तरी बेरोजगारीचे संकट मोठ्या प्रमाणात दूर होऊ शकते, परंतु सरकारची इच्छा नाही. यामुळे सरकारविरुद्धचा रोष वाढत चालला असून उद्या तो महागात पडू शकतो, हे धोरण ठरविणार्‍यांनी लक्षात घ्यावे, असे - संजय पाईकराव यांनी सांगितले.

पन्नाशीच्या घरात, तरी नोकरी नाही

प्राध्यापक होण्याची पूर्ण पात्रता असूनही अनेकांना नोकरी नाही. यातील काही उमेदवार तर पन्नाशीच्या घरात गेले आहेत. निवृत्तीपूर्वीची दहा वर्षे तरी सुखाने जगता येईल या आशेवर ते दिवस काढत आहेत. काहींचा नोकरी नसल्यामुळे चाळिशी उलटत येऊनही विवाह होऊ शकलेला नाही. काहींचा विवाह झाला आहे, मुले शाळेत जात आहेत. मात्र, प्राध्यापक होण्याच्या दुर्दम्य इच्छेपायी त्यांचे पुढील शिक्षण सुरूच आहे.