Sat, Jul 20, 2019 23:33होमपेज › Aurangabad › ओम नमः शिवायच्या गजरात वेरूळ दुमदुमले

ओम नमः शिवायच्या गजरात वेरूळ दुमदुमले

Published On: Feb 14 2018 2:50AM | Last Updated: Feb 14 2018 2:19AMखुलताबाद/वेरूळ : प्रतिनिधी 

महाशिवरात्रीच्या पर्वावर मंगळवारी (दि.13) ओम नमः शिवायच्या गजरात  व हर हर महादेवाचा जय घोष करत राज्यातून आलेल्या लाखो भाविकांनी वेरूळ येथील घृष्णेश्‍वराचेे मनोभावे दर्शन घेतले. दर्शनासाठी भाविकांनी सोमवारच्या रात्रीपासूनच मोठ्या संख्येने गर्दी केली होती. सकाळनंतर भाविकांच्या गर्दीत वाढ होत गेली. दुपारी मात्र अलोट गर्दी झाली होती. ती रात्री उशिरापर्यंत सुरू होती. मंदिरापासून अहिल्याबाई होळकर तीर्थकुंडापर्यंत दर्शनासाठी भाविकांची रांग होती. 

 दुपारी मंदिरापासून  महादेवाच्या चांदीचा मुखवटा वाजत गाजत मिरवणुकीद्वारे पालखीतून येथील शिवालय तीर्थकुंडावर नेऊन अभिषेक करण्यात आला. त्यानंतर पवित्र स्नान आणि महाआरतीचा कार्यक्रम अत्यंत भक्तीमय वातावरणात पार पडला. 

मंदिर परिसर स्वच्छ करून संस्थानच्या वतीने भाविकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. स्वयंसेवकांसाठी ओळखपत्र, भाविकांसाठी फिरते शौचालय, एक खिडकी सेवा कार्यपद्धती, आरोग्य सेवा आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. याशिवाय अखंड वीजपुरवठा, अग्निशामक दल, पोलिस कंट्रोल रूम, वायरलेस व पोलिस प्रशासन भाविकांच्या सेवेसाठी सज्ज होते. मंदिर परिसरावर सीसीटीव्ही कॅमेर्‍यांव्दारे निगराणी ठेवण्यात आली. 

महाशिवरात्रीनिमित्ताने वेरूळ येथे दर्शनासाठी येणार्‍या भाविकांच्या सोयी सुविधांसाठी श्री घृष्णेश्‍वर मंदिर संस्थानचे अध्यक्ष दीपक शुक्ला यांच्यासह सर्व विश्‍वस्त मंडळाने परिश्रम घेतले.  

पोलिस प्रशासनाचे वतीने औरंगाबाद ग्रामीणचे पोलिस अधीक्षक आरती सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक हरीश खेडकर यांनी मंदिरासह संपूर्ण यात्रा परिसरात तगडा बंदोबस्त लावला होता. 

महाशिवरात्री यात्रेदरम्यान भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून भोसले चौकापासून ते लेणी परिसरातील पर्यटक अभ्यागत केंद्रापर्यंत राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला.