होमपेज › Aurangabad › महानिर्मिती कंपनीची परीक्षाच वादात

महानिर्मिती कंपनीची परीक्षाच वादात

Published On: Jan 09 2018 1:32AM | Last Updated: Jan 09 2018 12:28AM

बुकमार्क करा
औरंगाबाद : प्रतिनिधी

12 नोव्हेंबर 2017 रोजी महानिर्मिती कंपनीचा लिपिक पदाचा पेपर होता. दरम्यान, 11 नोव्हेंबरलाही या कंपनीचा एक पेपर होता. त्यात दिनेश पवारच्या जागी आरोपी रिजवान शेख हा डमी परीक्षार्थी म्हणून बसला होता. दुसर्‍या दिवशी तो स्वतः परीक्षा देण्यासाठी अहमदनगरला गेला. त्याने दोन वेळा पेपर फोडला, अशी कबुली मुख्य आरोपी अर्जुन घुसिंगे याने दिली. त्यामुळे ही परीक्षाच वादात सापडली असून याची अधिक चौकशी मुकुंदवाडी पोलिस करणार आहेत. त्यासाठी एक पथक अहमदनगर येथे जाणार आहे. 

12 नोव्हेंबर रोजी महानिर्मिती कंपनीची लिपिक पदाची ऑनलाइन परीक्षा झाली. या परीक्षेत अहमदनगर येथील सेंटरवरून आरोपी रिजवान शेख याने हायटेक कॉपीचा वापर करून पेपर फोडला. त्याला घुसिंगे आणि टोळी बाहेरून उत्तरे देत होती. हे रॅकेट मुकुंदवाडी ठाण्याचे निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे, उपनिरीक्षक हारुण शेख, हवालदार अस्लम शेख यांनी उघडकीस आणले. यातील काही आरोपींना पहिल्याच दिवशी अटक करण्यात आली होती. मात्र, मुख्य आरोपी अर्जुन घुसिंगे याने मुकुंदवाडी पोलिसांना चांगलाच घाम फोडला. तब्बल दोन महिन्यांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता, परंतु पोलिसांनी त्याची शोधमोहीम काही थांबविली नाही. दरम्यान, 7 जानेवारी रोजी तो मूळगावी येणार असल्याची माहिती मिळाल्यावर मुकुंदवाडी ठाण्याचे पोलिस वेशांतर करून गावात थांबले. त्यांनी घुसिंगेच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून हायटेक डिव्हाइस, मोबाइल जप्त करण्यात आला आहे.

दिनेश पवारचे कागदपत्र सापडले

महानिर्मिती कंपनीच्या लिपिक पदाच्या ऑनलाइन पेपर फुटी प्रकरणात मुकुंदवाडी पोलिसांनी मास्टरमाइंड अर्जुन कारभारी घुसिंगे (23, रा. बेलाचीवाडी) याला अटक केली. त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून घुसिंगे याने आता तोंड उघडले आहे. तसेच, त्याच्याकडून दिनेश पवार या परीक्षार्थीचे मूळ कागदपत्र जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

दहा आरोपी, साडेपंधरा लाखांचा मुद्देमाल

हायटेक कॉपी प्रकरणात आतापर्यंत दहा आरोपी आणि 15 लाख 60 हजार 230 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी सर्व हायटेक डिव्हाइस जप्त केले असून हे कोठून खरेदी केले?, आणखी किती परीक्षांमध्ये याचा वापर केला?, किती उमेदवारांना आतापर्यंत नोकरी मिळवून दिली? याबाबतची माहिती चौकशीत समोर येणार आहे.