Tue, Jul 23, 2019 10:27होमपेज › Aurangabad › जवळ 60 रुपये अन् मध्यरात्री ‘सैराट’ झाले प्रेमीयुगुल

जवळ 60 रुपये अन् ‘सैराट’ झाले प्रेमीयुगुल

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

‘तो’ 17 वर्षे 5 महिने वयाचा, तर ‘तिचे’ वय अवघे 17 वर्षे 22 दिवस... दोघेही अल्पवयीन... कॉलेजमध्ये त्यांच्यात मैत्री झाली... पुढे त्यांच्यात प्रेमाचा अंकुर फुलला... प्रेमाचे हे रोपटे वाढत असल्याची बाब ‘तिच्या’घरापर्यंत गेल्यावर आई-वडिलांनी लग्नाचा विचार सुरू केला... हा प्रकार जसा ‘त्याला’ समजला, तसे त्याने पळून जाण्याचे प्लॅनिंग आखले अन् मध्यरात्री 1 वाजता ‘तिला’ घेऊन त्याने दोघांचा जीव धोक्यात घालून चक्क ट्रकमधून तीन तासांचा प्रवास करीत सेलू रेल्वेस्टेशन गाठले. विशेष म्हणजे, यावेळी दोघांकडे मिळून केवळ 60 रुपये होते. ‘प्रेम खरंच आंधळे असते’ हे पुन्हा समोर आले.

दरम्यान, सेलू रेल्वेस्टेशनवरून मुकुंदवाडी (औरंगाबाद) रेल्वेस्टेशनवर उतरलेल्या या ‘सैराट’ प्रेमीयुगुलाला औरंगाबाद गुन्हे शाखा पोलिसांनी पकडले. त्याची माहिती आष्टी (ता. परतूर, जि. जालना) पोलिसांना दिल्यावर तेथील एक पथक येऊन जोडप्याला घेऊन गेले. दरम्यान, पोलिस निरीक्षक शिवाजी कांबळे, सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी महिला दक्षता समितीच्या सदस्यांना बोलावून दोघांचेही समुपदेशन केले. याबाबत अधिक माहिती अशी की, सूरज (नाव बदललेले आहे) आष्टीच्या एका विद्यालयात बारावी सायन्सचे शिक्षण घेतो. तर, आरती (नाव बदललेले आहे) त्याच विद्यालयात अकरावीला शिकते. ऑगस्ट 2017 मध्ये त्यांची ओळख झाली. ओळखीतून मैत्री आणि पुढे ते एकमेकांच्या प्रेमात पडले. 

दरम्यान, हा प्रकार आरतीच्या घरच्यांना समजल्यावर त्यांनी तिच्या लग्नाचा विचार सुरू केला. आपले प्रेम आपल्याला मिळत नाही, हे लक्षात आल्यावर सूरजने पळून जाऊन लग्न करण्याचे ठरविले. त्यानुसार, 26 मार्च रोजी रात्री 11 वाजता सूरजने आरतीला फोन करून आष्टीतील सेलू रोडवर येण्यास सांगितले. मध्यरात्रीनंतर 1 वाजता आरती आणि सूरज सेलू रोडवर आले. त्यांनी एका अनोळखी ट्रकचालकाला हात दाखवून त्यातून प्रवास केला. पहाटे 4 वाजता ते सेलू रेल्वेस्टेशनवर आले. सकाळी साडेसहा वाजता तेथून ते औरंगाबादकडे येणार्‍या रेल्वेत बसले. 27 मार्च रोजी सकाळी साडेदहा वाजता ते मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनवर आले.


  •