Mon, Jul 22, 2019 05:19होमपेज › Aurangabad › उचलेगिरी : वादाचे कारण ‘अर्थ’कारण

उचलेगिरी : वादाचे कारण ‘अर्थ’कारण

Published On: Jul 05 2018 1:36AM | Last Updated: Jul 05 2018 12:36AMऔरंगाबाद : गणेश खेडकर

वाहतूक नियोजनासाठी असणार्‍या पोलिस कर्मचार्‍यांना ‘उचलेगिरी’चे ‘टार्गेट’ दिले जाते. त्यामुळे ते सर्वसामान्यांशी असभ्य वर्तन करतात. तसेच, वाहने उचलणार्‍या गाडीवरच ड्यूटी मिळावी म्हणून साहेबांना ‘खूश’ करण्याची पद्धत रुळल्यामुळेही कर्मचारी बाहेर अवैधपणे कारवाई करतात, अशी ओरड वाहनचालकांमधून होत आहे. सोमवारी सिडको वाहतूक शाखेच्या कर्मचार्‍यांनी वाहनचालक आणि लोकप्रतिनिधींशी वाद घातल्यामुळे दोघांना निलंबित करण्यात आले. या कर्मचार्‍यांनी वाद का घातला? हे तपासले तर त्यामागील ‘अर्थ’कारण स्पष्ट होते.  

आ. अतुल सावे यांच्या पुंडलिकनगर कार्यालयासमोरून सोमवारी काही दुचाकी गाड्या सिडको वाहतूक शाखेचे पोलिस कॉन्स्टेबल निहालसिंग ठाकूर यांच्या वाहनाने उचलल्या होत्या. या प्रकरणावरून माजी नगरसेवक सुरेंद्र कुलकर्णी यांच्याशी त्यांचा वाद झाला होता. शेवटी आ. सावे यांनी सिडको वाहतूक शाखेत जाऊन तक्रार केली. तसेच, हा प्रकार वरिष्ठांच्या कानावर घातला. त्यात पोलिस निरीक्षकांना या प्रकरणाचा अहवाल मागविला. त्यांनी दोन्ही कर्मचार्‍यांचा कसुरी अहवाल पाठविला. त्यावरून हवालदार शेख रज्जाक आणि कॉन्स्टेबल निहालसिंग ठाकूर यांना निलंबित केले आहे. दरम्यान, नो पार्किंगची वाहने उचलणार्‍या पोलिस व्हॅनवर, तसेच क्रेनवर ड्यूटी देण्यासाठी साहेबांना खूश करण्याची नवी पद्धत सुरू झाली आहे. त्यामुळे या व्हॅनवर कर्तव्य करणार्‍या पोलिसांकडून अनेकदा असभ्य भाषेत बोलण्याच्या चुका होतात. त्यांना साहेबही पाठीशी घालतात. असे प्रकार वाढल्यामुळे पोलिस आणि जनता यांच्यात दरी निर्माण होऊ लागली आहे.