Sat, Nov 17, 2018 12:06होमपेज › Aurangabad › बिबट्याने रोखला तासभर पोलिसांचा रस्ता 

बिबट्याने रोखला तासभर पोलिसांचा रस्ता 

Published On: Dec 05 2017 1:49AM | Last Updated: Dec 05 2017 1:49AM

बुकमार्क करा

सोयगाव : प्रतिनिधी

रात्रीच्या गस्तीसाठी जात असलेल्या पोलिसांच्या गाडीसमोर येऊन बिबट्याने एक तास ठाण मांडल्याचे अधिकार्‍यासह कर्मचार्‍यांची पाचावर धारण बसली होती. हा प्रकार सोमवारी रात्री 8 वाजेच्या सुुमारास सोयगाव तालुक्यातील वेताळवाडी जंगलात घडला. दरम्यान, पोलिस निरीक्षक सुजित बडे यांनी प्रसंगावधान साधून बिबट्याच्या तावडीतून एक तासानंतर सुटका करून घेतल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला.  

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार सोयगाव पोलिसांचे पथक सोमवारी रात्री हळदा (ता. सिल्लोड) घाटात रात्रीच्या गस्तीसाठी वाहनाने जात होते. वेताळवाडी-गलवाडा रस्त्यालगत आठ ते दहा वर्ष वयोगटातील बिबट्या डरकाळ्या फोडत पोलिसांच्या वाहनाला आडवा झाल्याचे पोलिस निरीक्षक सुजित बडे यांच्या लक्षात येताच त्यांनी वाहन वळविण्याचा सल्ला चालकाला दिला, परंतु बिबट्याने चवताळून पोलिसांच्या वाहनाचे दोन्ही बाजूंचे रस्ते अडवून ठेवल्याने काहीकाळ वाहनातच पोलिसांना ताटकळत बसावे लागले. दरम्यान, बडे यांनी प्रसंगाधान साधून तब्बल चाळीस मिनिटांच्या कालावधीनंतर स्वतःसह पोलिसांची बिबट्याच्या तावडीतून सुटका करून घेतली. यामुळे सर्वांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. 

सोयगाव परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून बिबट्याचा मुक्तसंचार सुरू असून  तो आमच्या गाडीला अडवा आल्याचा प्रत्यय आम्हाला आला आहे. त्यामुळे नागरिकांनी  काळजी घ्यावी, असे आवाहन बडे यांनी केले आहे. या परिसरात सर्रास बिबट्याचा मुक्‍तसंचार सुरू असताना त्याचा बंदोबस्त करण्यासासाठी वनविभाग मात्र काही उपायायोजना करत नसल्याचे यावरून दिसून येत आहे.