Mon, Apr 22, 2019 01:43होमपेज › Aurangabad › जिरायतीची बागायती करणारे गोत्यात

जिरायतीची बागायती करणारे गोत्यात

Published On: Feb 03 2018 2:26AM | Last Updated: Feb 03 2018 1:27AMऔरंगाबाद ः विशेष प्रतिनिधी

ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेच्या कालवा क्र. 2 मधील भूसंपादनात जिरायतीच्या जमिनी रातोरात बागायती करणारे गोत्यात आले आहेत. मूळ संयुक्‍त मोजणी आणि अधिसूचनेतील आकडेवारी जुळत नसल्याने जलसंपदा विभागाचे अधिकारी अडचणीत आले आहेत. महसूल आणि जलसंपदा विभागाच्या वादात मात्र शेतकरी भरडले जात आहेत.

पैठण तालुक्यातील वरुडी, शहापूर, वाहेगाव, वरवंडी आणि दिनायकपूर या गावांतील जमिनी ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेच्या टप्पा दोनमधील कालवा क्र. 2 साठी संपादित करण्यात आल्या होत्या. संयुक्‍त मोजणीत बहुतांश जमिनी जिरायती दाखविण्यात आल्या होत्या. मात्र अधिसूचनेत अनेक जमिनी रातोरात बागायती करण्यात आल्या. जिरायती क्षेत्राप्रमाणे शेतकर्‍यांना प्रतिएकरी 15 लाख रुपये मोबदला मिळणार होता. बागायती दाखविल्याने हा मोबदला एकरी 30 लाखांच्या घरात जाणार आहे. मर्जीतील शेतकर्‍यांवर 25 कोटी रुपयांची उधळपट्टी करण्याचा प्रताप पैठणच्या उपविभागीय अधिकारी आणि जलसंपदा विभागाने केला होता.

‘रातोरात जमिनी बागायती’ या मथळ्याखाली दैनिक पुढारीने याबाबत एक फेब्रुवारी रोजीच्या अंकात प्रसिद्ध केलेल्या वृत्ताने खळबळ उडाली. मूळ संयुक्‍त मोजणीची प्रत आणि अधिसूचनेची प्रत सादर करण्याबरोबरच दोन्हींवरील नोंदी तंतोतत जुळत असल्याचे प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जलसंपदा विभागास दिले आहेत. या नोंदी जुळत नसल्याने जिरायतीचे बागायती करणारे अडचणीत आले आहेत.