Wed, Apr 24, 2019 00:02होमपेज › Aurangabad › ‘खिडकी गँग’ने दिली, चार घरफोडींची कबुली

‘खिडकी गँग’ने दिली, चार घरफोडींची कबुली

Published On: Jan 09 2018 1:32AM | Last Updated: Jan 09 2018 12:20AM

बुकमार्क करा
औरंगाबाद : प्रतिनिधी

शहर पोलिसांसाठी डोकेदुखी ठरणार्‍या ‘खिडकी गँग’च्या मुसक्या गुन्हे शाखेेने आवळल्या. या टोळीला पुंडलिकनगर पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर चार घरफोडींचे गुन्हे उघडकीस आले आहेत. यातील सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक अशोक कटके यांच्या घरातून लंपास केलेल्या एकूण दागिन्यांपैकी 15 तोळे सोने जालना, गेवराई येथून जप्त करण्यात आले असून सराफांनाही अटक केली जाईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक लक्ष्मीनारायण शिनगारे यांनी दिली. 

सय्यद सिकंदर सय्यद अख्तर (35, रा. मोमिनपुरा, बीड, ह. मु. हर्सूल), शंकर तानाजी जाधव (पूरग्रस्त कॉलनी, बीड) सय्यद सिराज सय्यद लियाकत (32, रा. बीड, ह. मु. एमआयडीसी, अहमदनगर) आणि शेख बबलू शेख रहेमान (31, रा. एमआयडीसी, अहमदनगर) अशी खिडकी गँगमधील साथीदारांची नावे आहेत. त्यांच्याकडून लोखंडी कटवणी, दोन मोठे स्क्रू-ड्रायव्हर, दोन बॅटर्‍या आणि कार जप्त करण्यात आली होती. ही टोळी सध्या हर्सूल कारागृहात आहे. गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी कांबळे, सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल यांच्या पथकाने 30 नोव्हेंबर 2017 रोजी ही कारवाई केली होती. दरम्यान, अटकेतील ही टोळी पुंडलिकनगर ठाण्याच्या ताब्यात देण्यात आली. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक सय्यद सिद्दीकी यांनी टोळीतील साथीदारांची विचारपूस केली. त्यांनी सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक अशोक गोविंदराव कटके (एन-3) यांचे घर फोडल्याची कबुली दिली. 8 ऑगस्ट 2017 रोजी चोरट्यांनी समोरील खोलीची खिडकी उचकटून सहा लाख 3 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता. त्यातील साडेचार लाखांचे 15 तोळे सोने पोलिसांनी जालना, गेवराई येथील सराफांकडून जप्त केले आहेत. याशिवाय चार गुन्हे उघडकीस आले असून त्यातील काही मुद्देमालही उपनिरीक्षक रामचंद्र पवार यांच्या पथकाने जप्त केला आहे. 

खिडकी तोडून घरफोडी करण्याच्या सवयीच्या चौघांना अटक महिनाभरापूर्वीच अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून चार गुन्हे उघडकीस आले असून एका गुन्ह्यातील 15 तोळे सोने जप्त करण्यात आले आहे. या टोळीकडून आणखी घरफोडीचे गुन्हे उघडकीस येतील.
असे पोलिस निरीक्षक लक्ष्मीनारायण शिनगारे यांनी सांगितले.

महिन्याला कमवायचे दोन लाख

चारचाकीने प्रवास करायचा. औरंगाबाद, नगर, जालना, नांदेड, जळगाव, बीडसह विविध शहरांंंतील उच्चभ्रू वसाहतीत घुसायचे. रात्र झाली की, कंपाउंडमध्ये घुसून राहायचे. चोरी करायची आणि पहाटे मॉर्निंग वॉक करणार्‍यांबरोबर बाहेर पडायचे. याच पद्धतीने डल्ला मारणारी ही टोळी महिन्याला एकाला अंदाजे दोन लाख रुपये मिळतील, अशा पद्धतीने चोरी करीत असे. यातील सय्यद सिकंदर हा आयपीएल सट्ट्यावर तब्बल दोन कोटी रुपये हरला आहे.