औरंगाबाद: प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील कास पठाराच्या धर्तीवर औरंगाबद तालुक्यातील सारोळा वनक्षेत्रातही रान फुलांचे नंदनवन फुलणार आहे. वन विभागाने याचा अॅक्शन प्लॅन तयार केला असून नवीन वर्षात कामाला सुरुवात होणार आहे. इको टुरिझम या शासनाच्या योजनेंतर्गत वन विभागाने सारोळा पर्यटन केंद्राची निवड केली आहे.
येथे जवळपास 40 हेक्टर परिसरात वन विभागाकडून रान फुलांचे माळरान फुलवले जाणार आहे. यासाठी जवळपास चार कोटी रुपये खर्च होणार आहेत. नागरिकांनी वन संवर्धनाकडे वळावे तसेच पर्यटकांना वन पर्यटनाचा आनंद लुटता यावा यासाठी प्रशासनाकडून ही योजना आखण्यात आली आहे. जिल्ह्यातील हा पहिला प्रयोग आहे. 2020 पर्यंत ही योजना पूर्ण केली जाणार असल्याचे, मुख्य वनसंरक्षक प्रकाश महाजन यांनी दै. पुढारीशी बोलताना सांगितले.
औरंगाबाद जिल्ह्यातही आता ‘कास’ पठार
सारोळा वनक्षेत्राची निवड4 कोटी खर्च, चाळीस हेक्टरमध्ये फुलणार रान फुले सल्लागार अणि वास्तूतज्ज्ञ नेमणार इको टुरिझम योजनेबाबतकाही दिवसांतच शासनाकडून परिपत्रक जारी केले जाणार आहे. यामुळे वन विभागाने आपला अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. सारोळ्यात रान फुलांचे पठार फुलवण्यासाठी सल्लागार आणि वास्तूतज्ज्ञांचा वन विभाग शोध घेत आहे. त्यांच्या नियुक्तीनंतर काम सुरू होईल.
इतर विभागातही राबवणार उपक्रम मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्येही कास पठाराच्या धर्तीवर रान फुल लागवडीचा प्रयोग वन विभागाकडून राबवला जाणार आहे. याबाबत वन विभागाकडून सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यानंतर पर्यटन केंद्रांची निवड केली जाईल. रान फुलांचे माळरान विकसित करताना वन विभागाकडून त्या भागात आढणार्या वनस्पतींचाच वापर केला जाणार आहे. तसेच येथे पर्यटकांसाठी आवश्यक सोयी-सुविधाही विकसित केल्या जाणार आहेत. यात माहिती केंद्र, रान पायपाट, निवासस्थान, स्वच्छतागृह, पाण्याची व्यवस्था दींचा समावेश असल्याचेही मुख्य वनसंरक्षक महाजन यांनी सांगितले.