Fri, Jul 19, 2019 00:53होमपेज › Aurangabad › जांगडगुत्ता : माकडांचा मुक्‍तिदिन...

जांगडगुत्ता : माकडांचा मुक्‍तिदिन...

Published On: Jan 21 2018 10:19AM | Last Updated: Jan 21 2018 10:19AM औरंगाबाद : प्रदीप भागवत

जंगलातील एका झाडाखाली शेकडो माकडे ‘भंडारा छिडक... दुश्मनची कैसी वाट लावली’ या गाण्यावर बेधुंद डान्स करीत होती. एका झाडाच्या बुंध्याला शास्त्रज्ञ डार्विनचा फोटो लावलेला होता आणि त्यावर ठळक लाल फुली मारलेली होती. तेवढ्यात एक बुढा म्हातारा तेथे आला आणि त्याने चक्‍क डार्विनचा फोटो डान्स करणार्‍या माकडांत भिरकावून दिला. त्याऐवजी एका मंत्र्याचा फोटो झाडाला लावला. खिशातून दहा रुपयांचा हार काढून त्या फोटोला घातला...आणि मग तोही डान्समध्ये सहभागी झाला. कित्येक तास डान्स चालल्यानंतर सर्व जण शांत झाले. एका एका माकडाने मग विचार मांडायला सुरुवात केली.

बुढा माकड : मित्रांनो, आज आपला मुक्‍तिदिन. आपण कित्येक शतकांच्या जोखडातून मुक्‍त झालो आहोत. एका भारतीय मंत्र्याने चक्‍क माकड हे माणसांचे पूर्वज नसल्याचे सांगून आपली मुक्‍तता केली आहे. माकडचाळे करणार्‍या माणसांचे आपण पूर्वज म्हणजे खूपच डिस्गस्टिंग वाटत होते. आता कसे मोकळे झाल्यासारखे वाटते.

तरुण माकड : हो ना राव. कोण तो डार्विन... त्याने आपल्याला चक्‍क माणसांच्या रांगेतच बसवले नव्हे तर त्यांचे पूर्वजही करून टाकले. आपण काय माणसांएवढे... हे आहोत का?

बुढा : जाऊ दे रे, कशाला त्याचे नाव काढतो आता. लवकरच तो इतिहासजमा होईल आणि या मंत्रीत्रमहोदयांचे नाव पुस्तकात नवीन शोध लावला म्हणून येईल. त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत.

तरुण माकड : मी तर म्हणतो या मंत्री महोदयांना आपल्या बिरादरीचा सर्वोच्च माकडशिरोमणी पुरस्कार द्यायला पाहिजे. वाटल्यास मी प्रस्ताव ठेवतो.

बुढा : व्हेरी गुड. मी त्याला तत्काळ अनुमोदन देतो. होऊन जाऊ द्या. (सर्व माकडे शेपूट वर करून प्रस्तावाला अनुमोदन देतात) मी आताच यंदाचा हा पुरस्कार त्या मंत्रीमहोदयांना जाहीर करतो. (सर्व माकडे ची ची करून आनंद व्यक्‍त करतात)

म्हातारी माकडीन : लई बेस झालं बाबा. मी जल्मापासून त्या डार्विनला शोधत होते, पण सापडला नाही. नाही तर त्याला उलटा करून झाडाला लटकावला असता. त्याच्या फोटोवर मीच लहानपणी फुली मारली होती. आधीच वर गेला म्हणून वाचला.

तरुण माकड : आजीबाई, तुम्ही टेंशनच घेऊ नका. सगळा इतिहास- भूगोलच बदलणार आहे बघा. येथून पुढे आपल्याला कोणी माणसांचा पूर्वज म्हणणार नाही. आपण कुठे, ती माणसं कुठे? आपली आणि त्यांची बरोबरी कशी होणार? बरं, या माणसांचं बरं आहे, जे जे काही वाईट करतात त्यात सगळ्या प्राण्यांना बळीचा बकरा बनवतात. म्हणजे एखाद्याने लाथ मारली की म्हणतात... काय गाढवासारख्या लाथा मारतोस, गाढव कुठचा. कोणी काही चित्रविचित्र प्रकार केला की, त्याला म्हणतात काय माकडचाळे करतोस? बिचार्‍या कुत्र्यांना तर विचारूच नका. थेट ....कुत्तों, मैं तुम्हारा खून पी जाऊंगा, असे ललकारतात. लहान पोट्टे-सोट्टे पण कमी नाहीत. माकडा-माकडा हुप्प, तुझ्या शेंडीला तूप... असे चिडवितात. किती ही बदनामी. आपण असं काही माणसांना नावं ठेवतोत का?

बुढा : जाऊ दे बेटा. आज सेलिब्रेशनचा दिवस आहे. लेटस् डान्स.