औरंगाबाद : प्रतिनिधी
आरटीई प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून, पहिल्या फेरीतील प्रवेश सध्या सुरू आहेत. मात्र शहरातील काही संस्थाचालक आमच्या शाळेचे स्थलांतर होणार आहे, असे पालकांना सांगून विद्यार्थ्यांना प्रवेश देणे टाळत आहेत. अशा शाळांना स्थलांतर करता येणार नाही, तसेच त्या शाळांना आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावेच लागतील, अन्यथा कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जि. प. शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जयस्वाल यांनी दिली.
आरटीई अंतर्गत 2018-19 या वर्षांत 25 टक्के मोफत प्रवेशाची प्रक्रिया 10 जानेवारीपासून सुरू झाली. त्यात 31 जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील एकूण 565 शाळांनी नोंदणी केली. या शाळांमध्ये एकूण 6 हजार 371 जागांवर आरटीई अंतर्गत प्रवेश देण्यात येत आहेत. पालक व विद्यार्थ्यांसाठीची नोंदणी प्रक्रिया 10 फेबु्रवारीपासून सुरू करण्यात आली होती. 11 मार्चपर्यंत 11 हजार 121 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली. या प्रवेश प्रक्रियेचा पहिल्या फेरीचा लकी ड्रॉ काढण्यात आला असून पहिल्या फेरीसाठीचे प्रवेश सध्या सुरू आहेत. काही शाळा प्रवेश देताना विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांत काही चुका काढत आहेत, तर काही संस्थाचालक आमच्या शाळेचे येथून स्थलांतर होणार आहे असे पालकांना सांगत आहेत. जेणेकरून त्या पालकांनी त्या शाळेत विद्यार्थ्यांचा प्रवेश घेऊ नये. मात्र अशी शक्कल लढवणार्या शाळांनी सावध होण्याची वेळ आली आहे, कारण असे प्रकरण आढळल्यास त्या शाळांवर शिक्षण विभागाकडून कारवाई करण्यात येईल असे शिक्षणाधिकार्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
Tags : Aurangabad, Aurangabad News, going to, shift, our school!