Wed, Apr 24, 2019 12:27होमपेज › Aurangabad › कंपन्यांच्या पाणीपुरवठ्यात 20 टक्के कपात

कंपन्यांच्या पाणीपुरवठ्यात 20 टक्के कपात

Published On: Mar 20 2018 1:47AM | Last Updated: Mar 20 2018 1:47AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

शहरवासीयांना दोन दिवसांआड पाणी मिळणेही कठीण झालेले असताना शहराच्याच शुद्ध पाण्यावर चक्‍क 12 कंपन्यांची तहान भागविली जात आहे. जायकवाडी धरणापासून औरंगाबादपर्यंत मनपाच्या मुख्य जलवाहिनीवरून या कंपन्यांना कनेक्शन दिलेले आहे. याविषयी दै. पुढारीने चार दिवसांपूर्वीच सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. त्याचे पडसाद सोमवारी मनपा सर्वसाधारण सभेत उमटले. भाजप आणि एमआयएमच्या नगरसेवकांनी या कंपन्यांच्या पाणीपुरवठ्यावर आक्षेप घेतला. त्यानंतर महापौरांनी या कंपन्यांच्या पाणीपुरवठ्यात 20 टक्के कपात करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.

औरंगाबाद शहरात मागील काही वर्षांपासून पाण्याची टंचाई जाणवत आहे. शहरातील कित्येक वॉर्डांना चार दिवसांआडही पाणी मिळणे कठीण झाले आहे. उन्हाळ्यात ही परिस्थिती आणखी गंभीर होणार आहे. असे असताना मनपाकडून चक्‍क बारा कंपन्यांची तहान भागविली जात आहे. त्यांना थेट कनेक्शनद्वारे चोवीस तास पाणी पुरवठा केला जातो. उद्योगांना पाणीपुरवठा करण्यासाठी जायकवाडी जलाशयावरच एमआयडीसीची स्वतंत्र यंत्रणा आहे. तरीही फारोळा शुद्धीकरण केंद्रात शुद्ध करण्यात आलेले पाणी औद्योगिक वापरासाठी पुरविले जात आहे. याबाबत दै. पुढारीने 15 मार्च रोजीच्या अंकात प्रकाश टाकला होता. त्याचे पडसाद सोमवारी मनपा सभेत पाण्याच्या विषयावरील चर्चेदरम्यान उमटले. 

शहरातील पाणी पुरवठा विसकळीत झाल्याबद्दल नगरसेवकांनी सभागृहात तीव्र नाराजी व्यक्‍त केली. त्याचवेळी भाजपच्या नगरसेवकांनी कंपन्यांना केल्या जाणार्‍या पाणीपुरवठ्याचा मुद्दा मांडला. इथे शहरात लोकांना पिण्यासाठी पाणी देणे अवघड झाले आहे. दुसरीकडे आपण आपल्याच जलवाहिनीवरून कंपन्यांना पाणीपुरवठा करत आहोत. हे चुकीचे आहे. पाण्याची उपलब्धता लक्षात घेता हा पुरवठा बंद करावा, अशी मागणी या नगरसेवकांनी केली. एमआयएमच्या नगरसेवकांनीही त्यास पाठिंबा दर्शवित ही मागणी लावून धरली. त्यानंतर महापौर नंदकुमार घोडेले यांनी या कंपन्यांच्या पाणीपुरवठ्यात 20 टक्के कपात करण्याचे आदेश दिले.