होमपेज › Aurangabad › औरंगाबादमध्ये सलग दोन दिवसांत दोघांचे अवयवदान

औरंगाबादमध्ये सलग दोन दिवसांत दोघांचे अवयवदान

Published On: Jun 23 2018 8:17AM | Last Updated: Jun 23 2018 8:17AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

मिसारवाडी येथील पंधरा वर्षीय प्रतीक वाहूळकर या बे्रनडेड झालेल्या मुलाचे एमजीएम रुग्णालयात अवयवदान करण्यात आले. त्याचे हृदयमुंबई, यकृत नागपूर तर दोन्ही किडण्यांचे औरंगाबादेत प्रत्यारोपण करण्यात आले. प्रतीकच्या अवयवदानामुळे चार जणांना जीवनदान मिळाले असल्याची माहिती एमजीएमचे उपअधिष्ठाता डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांनी दिली आहे.

मोटरसायकल अपघातात डोक्याला मार लागल्याने प्रतीक वाहूळकर या विद्यार्थ्याला 19 जून रोजी एमजीएम रुग्णालयात भरती करण्यात आले होते. उपचारांती 21 जून रोजी दुपारी 2 वाजता डॉक्टरांनी त्याला बे्रनडेड घोषित केले. यानंतर दुसरी चाचणी रात्री आठ केल्यानंतर बे्रनडेडवर शिक्‍कामोर्तब करण्यात आले. डॉक्टरांनी नातेवाइकांना याची कल्पना देऊन अवयवदानाबाबत माहिती दिली.  रुवातीला आई-वडिलांसह नातेवाइकांचा अवयवदानासाठी विरोध होता. मात्र, नंतर त्यांनी यास होकार दिला. यानंतर झेडटीसीसीने पुढील सूत्रे हलविली.

एमजीएमच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी गुरुवारी रात्री ऑपरेशनला सुरुवात केली. शुक्रवारी हे ऑपरेशन पूर्ण झाले. प्रतीकचे हृदय मुंबईला फोर्टीस रुग्णालयात पाठविले. यकृत नागपूरला, तर एक किडनी एमजीएम
रुग्णालयातील रुग्णावर प्रत्यारोपण करण्यात आली. दुसरी किडनी सिग्मा रुग्णालयात महिला रुग्णावर प्रत्यारोपण करण्यात आली. डोळ्यांचा कॉर्निया घाटी नेत्रविभागात पाठविण्यात आला.

दोन वाजता तयार केला ग्रीन कॉरिडॉर
प्रतीकचे हृदय व यकृत नेण्यासाठी शासनाची विशेष परवानगी घेऊन चॅर्टर्ड प्लेनची व्यवस्था करण्यात आली होती. नागपूर येथील न्यू इरा रुग्णालयाचे पथकही यकृत नेण्यासाठी हजर झाले होते. यकृत व हृदय विमानतळावर पोहोचविण्यासाठी पोलिसांनी एमजीएम रुग्णालय ते विमानतळ ग्रीन कॉरिडॉर बनविला. यानंतर चॅर्टर्ड प्लेनने मुंबईसाठी उड्डाण केले. तेथे हृदय फोर्टिस रुग्णालयाकडे रवाना करण्यात आले, तर दुसर्‍या विमानाने नागपूरसाठी यकृत रवाना झाले. न्यू इरा रुग्णालयात यकृताचे प्रत्यारोपण करण्यात आले.

दूध डेअरी चौकात झाला अपघात
इयत्ता आठवीत शिकणारा प्रतीक आपल्या दोन मित्रांसोबत जालना रोडने ट्रिपल सीट चालला असताना, दूध डेअरी चौकाजवळ अपघात झाला. यात प्रतीकच्या डोक्याला मार लागून तो बेशुद्धावस्थेत पडला, तर एका मित्राला फ्रॅक्‍चर, तर दुसर्‍याला किरकोळ मार लागला. प्रतीकला 19 जून रोजी सायंकाळी 4 वाजता एमजीएम रुग्णालयात दाखल केले होते.