Sun, Apr 21, 2019 00:38होमपेज › Aurangabad › पत्नीला उच्चशिक्षित करण्याचे ‘त्याचे’ स्वप्न राहिले अधुरे..!

पत्नीला उच्चशिक्षित करण्याचे ‘त्याचे’ स्वप्न राहिले अधुरे..!

Published On: Dec 28 2017 1:34AM | Last Updated: Dec 28 2017 12:56AM

बुकमार्क करा
औरंगाबाद : प्रतिनिधी

स्वतः पुण्याच्या एका मोठ्या कंपनीत कायमस्वरूपी नोकरीला असलेल्या तरुणाने पत्नीच्या शिक्षणाला प्राधान्य दिले, परंतु तिला उच्चशिक्षित करण्याचे त्याचे स्वप्न एका अपघाताने अधुरेच राहिले. संगणकशास्त्रात एमएस्सी करणार्‍या पत्नीला परीक्षेसाठी घेऊन जाणार्‍या पतीच्या दुचाकीला बुधवारी (दि. 27) सकाळी साडेआठ वाजता पडेगावात ट्रकने चिरडले. यात पतीचा मृत्यू झाला तर, पत्नी गंभीर जखमी झाली. 

विनोद शिवनाथ मानकापे (26, रा. जातेगाव, ता. फुलंब्री) असे मृत तरुणाचे नाव आहे. या अपघातात कल्याणी विनोद मानकापे (22) ही गंभीर जखमी झाली असून तिच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अपघाताबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विनोद पुण्यात एका मोठ्या कंपनीत कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून नोकरीला होता. तर, पत्नी कल्याणीची एमएस्सी कंप्युटर सायन्सची परीक्षा सुरू आहे. त्यासाठी तिला दुचाकीवरून खुलताबाद येथे घेऊन जाण्यासाठी तो मंगळवारीच पुण्याहून गावाकडे आला होता. पण, दोघेही एन-13, हडको येथील सासुरवाडीत थांबले. बुधवारी सकाळी ते तेथून खुलताबादला परीक्षेसाठी निघाले. थंडी असल्यामुळे आठ महिन्यांच्या चिमुरड्याला घरीच ठेवले होते. त्यांची दुचाकी शहरातून पडेगावमार्गे जात असताना पठाण ढाब्यासमोर ओव्हरटेक करण्याच्या नादात ट्रकने त्यांना चिरडले. हा अपघात एवढा भीषण होता की, विनोदच्या चेहर्‍याचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता. तो जागीच गतप्राण झाला. तर, कल्याणी गंभीर जखमी झाली. दौलताबाद ठाण्याचे सहायक फौजदार संजय निकम, जमादार साळवे, त्रिभुवन यांनी कल्याणीला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या अपघाताची छावणी ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 

बालपणातच हरपले वडिलांचे छत्र

पडेगावातून जाणारा हा रस्ता मृत्यूचा महामार्ग ठरू लागला आहे. या रस्त्यावर नेहमी जीवघेणे अपघात होतात. वर्षभरात अनेकांना  जीव गमवावा लागला आहे. विनोद आणि कल्याणीचे अतिशय सुखी कुटुंब होते. दोन वर्षांपूर्वी विवाह झालेल्या या दांपत्याला आठ महिन्यांचा मुलगा आहे. बालपणातच त्याचे वडिलांचे छत्र हरपल्याने सर्वत्र हळहळ व्यक्‍त होत आहे.