Tue, Jan 22, 2019 15:14
    ब्रेकिंग    होमपेज › Aurangabad › घोड्याने लाथ मारल्याने तरुणाचा मृत्यू

घोड्याने लाथ मारल्याने तरुणाचा मृत्यू

Published On: Jan 14 2018 1:51AM | Last Updated: Jan 14 2018 12:19AM

बुकमार्क करा
औरंगाबाद : प्रतिनिधी

घोडे पाहण्यासाठी गेलेल्या एका तरुणाच्या जबड्यावर घोड्याने लाथ मारल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. शेख आरेफ हनीफ खान (वय 25, रा. बायजीपुरा) असे मृत तरुणाचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख आरेफ याला घोडे पाहण्याची आवड होती. आरेफचा किराडपुरा येथे राहणारा त्याचा मित्र युसूफ खान याच्याकडे घोड्यांचा तबेला आहे. त्यांने दोन नवीन घोडे आले असल्याचे आरेफला कळाले. त्यामुळे  शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास आरेफ हा घोडे पाहण्यासाठी मित्र युसूफ खानकडे गेला होता. या वेळी घोड्याच्या पाठीवरून हात फिरवत असताना अचानक घोड्याने आरेफच्या जबड्यावर लाथ मारल्याने तो जखमी झाला. हा प्रकार त्याच्या मित्राच्या लक्षात येताच त्यांनी आरेफला तत्काळ जवळच्याच एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र प्रकृती जास्त बिघडल्याने त्याला घाटीत दाखल करण्यात आले. मात्र उपचारदरम्यान आरेफचा मृत्यू झाला. आरेफ हा दुचाकीच्या बॅटरी दुरुस्तीचे काम करून उदरनिर्वाह करत होता. त्याचे 8 महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. या प्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  पोलिस हवालदार सचिन जगताप हे तपास करीत आहेत.