Thu, Apr 25, 2019 15:24होमपेज › Aurangabad › लाच घेणारा मुख्याध्यापक जाळ्यात

लाच घेणारा मुख्याध्यापक जाळ्यात

Published On: Feb 21 2018 1:46AM | Last Updated: Feb 21 2018 1:41AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

वेतन पडताळणीचे काम करून दिल्याने शाळेच्या शिपायाकडून बक्षीस म्हणून दीड हजारांची लाच घेणारा मुख्याध्यापक  अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोच्या जाळ्यात अडकला आहे. हा प्रकार कन्नड तालुक्यातील कालीमठ येथे असलेल्या स्वामी प्रणवानंद सरस्वती हायस्कूलमध्ये मंगळवारी घडला. कैलास गोपीचंद आमले (वय 52, रा. कालीमठ) असे मुख्याध्यापकाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वामी प्रणवानंद सरस्वती हायस्कूल येथे कार्यरत असलेल्या शिपायाचे सेवापट वेतन पडताळणीचे मुख्याध्यापकाकडे काम होते. यासाठी शिपाई, मुख्याध्यापक कैलास आमले यांच्याकडे गेले असता त्यांनी पडताळणी करून दिली. मात्र त्यानंतर आरोपी आमले हा शिपायाकडे काम करून दिले म्हणून दीड हजार रुपये बक्षीस म्हणून दे, यासाठी मागे लागला होता. हे बक्षीस देण्याची शिपायाची इच्छा नसल्याने त्यांनी अ‍ॅन्टी करप्शन ब्युुुरोकडे तक्रार दिली. त्यानुसार मंगळवारी पोलिसांनी कालीमठ शाळेत सापळा रचला.

यावेळी आमले हे त्यांच्या कक्षात शिपायाकडून दीड हजार रुपये घेत असताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई एसीबीचे अधीक्षक श्रीकांत परोपकारी, अपर अधीक्षक जिरगे, उपअधीक्षक किशोर चौधरी यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक सचिन गवळी, एस. एस. शेगोकार, कर्मचारी अश्‍वलिंग होनराव, दिगंबर पाठक, भीमराव जिवडे, संतोष जोशी, संदीप चिंचोले यांनी केली. या प्रकरणी कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.