Mon, Jan 21, 2019 05:45होमपेज › Aurangabad › आंदोलनकर्त्यांनी दूध विकत घेऊन वाटावे

आंदोलनकर्त्यांनी दूध विकत घेऊन वाटावे

Published On: May 09 2018 1:57AM | Last Updated: May 09 2018 1:38AM
औरंगाबाद : प्रतिनिधी

दूध दरवाढीसाठी आंदोलन करणारे शेतकरी नाहीत. शेतकरी कधीच दूध फुकट वाटत नाही. आंदोलकांनी शेतकर्‍यांकडून दूध विकत घेऊन मगच फुकट वाटावे, असे मत विधान सभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केले. शासनाने नुकताच दूध पावडर निर्मितीवर प्रतिलिटर तीन रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतल्याचेही ते म्हणाले.

जिल्हा दूध संघाच्या देवगिरी महानंद बँ्रडच्या आइस्क्रीम लाँचिंग प्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत विधानसभा अध्यक्ष बागडे बोलत होते. सध्या दूध दरवाढीसाठी सुरू असलेल्या आंदोलनांकडे लक्ष वेधले असता, मोफत दूध वाटप करणारे कोण आहेत, हे आम्हाला माहिती आहे. कोणताही दूध उत्पादक शेतकरी कधीच फुकट वाटत नाही. आंदोलनकर्त्यांनी शेतकर्‍यांकडील दूध विकत घ्यावे आणि मगच फुकट वाटावे, असे बागडे म्हणाले. देवगिरी महानंदने नेहमीच शासनाने जाहीर केलेल्या दरापेक्षा जास्त भाव दिला. मात्र, सध्या भाव कमी झाल्याने तोटा होत असून आम्हालाही दर कमी करावा लागल्याचा दावा त्यांनी केला.

...तर दर कोलमडेल
मागणीच्या तुलनेत दुधाचे उत्पादन जास्त असल्याने दर कमी झाले आहेत. त्यामुळे शासनाने नुकताच दूध पावडर निर्मितीवर प्रतिलिटर तीन रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, भविष्यातही हीच स्थिती राहिली तर दुधासह पावडरचा साठाही वाढेल आणि पर्यायाने दुधाचे दर कोलमडण्याची भीती बागडे यांनी व्यक्त केली.

व्यावसायिकदृष्ट्या तोट्यात
व्यायसायिकदृष्ट्या दुग्ध व्यवसाय परवडतच नाही. तो शेतीला पूरक व्यवसाय आहे. अन्यथा भांडवलदारांनी गाई-म्हशीच घेतल्या असत्या. मात्र, ते यासाठी लागणारे साहित्य, खाद्यपदार्थांच्या निर्मितीत रस दाखवतात, असे बागडे यांनी नमूद केले.

Tags : haribhau bagde,  milk protest