होमपेज › Aurangabad › मी देखील मराठा : हार्दिक पटेल(व्हिडिओ)

मी देखील मराठा : हार्दिक पटेल(व्हिडिओ)

Published On: May 29 2018 11:23PM | Last Updated: May 29 2018 11:23PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

जय भवानी.. जय शिवाजी अशी घोषणा देत, संभाजीनगर, वीर मराठा बंधू अशा शब्दांनी साद घालत, आणि पाटीदार नेता... पाटीदार नेता बोलकर आपने मुझे पाटीदार समाज का नेता बना दिया, पर हकीकत मे मै खुद मराठा हू, असे म्हणत हार्दिक पटेल यांनी अखिल भारतीय छावा संघटनेच्या महाअधिवेशनात आपली छाप पाडली. मागितल्याशिवाय आईपण जेवू घालत नाही, घरात बसून काहीही मिळणार नाही, जाड चमडीचे हे लोक न मागता कुणालाही काहीही देत नाहीत. एकजुटीने लढा उभारा, आरक्षण मिळेल, कर्जमाफीही मिळेल, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. 

सिडकोतील राजीव गांधी स्टेडियमवर आयोजित अखिल भारतीय छावा संघटनेच्या अकराव्या राष्ट्रीय महाअधिवेशनात हार्दिक पटेल यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील, दादासाहेब अण्णासाहेब जावळे पाटील, प्रदेशाध्यक्ष भीमराव मराठे, विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील, प्रदेश संघटक अप्पासाहेब कुढेकर पाटील, प्रदेश सल्लागार भगवान माकणे, माहिती तंत्रज्ञानप्रमुख विश्‍वजित जाधव पाटील, प्रदेश सचिव नरेंद्र मराठे, उपाध्यक्ष सुधाकर पाटील, पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रताप कांचन, जिल्हाध्यक्ष किशोर शेरावत, शिवाजी मार्कंडे पाटील, प्रविण भुसारे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

हार्दीक पटेल म्हणाले, ‘‘आम्ही आरक्षण मागतोय, ते कसे द्यायचे, त्यासाठी कायदा कसा करायचा, हे काम सरकारचे आहे, त्यासाठीच आम्ही तुम्हाला सरकारमध्ये बसवले आहे. एस.सी., एस.टी, ओबीसींचा हक्क आम्ही हिरावून घेणार नाही. आम्हांला आमचे स्वतंत्र आरक्षण हवे. लाखोंच्या संख्येने मूक मोर्चे काढले, त्याचा परिणाम काय झाला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मराठ्यांना हिंदू-मुस्लिम विभाजन करून लढवले जात आहे. गेल्या अनेक वर्षापासून आपण काँग्रेस, सेना, भाजप, राष्ट्रवादी या पक्षाचे गुलाम बनलो आहोत. औरंगाबादेत नुकत्याच झालेल्या दंगलीत कुणाचे नुकसान झाले, ही परिस्थिती आता समजून घ्यावी लागेल. जाट, गुज्जर, पाटीदार, मराठे आदी सर्व मिळून आपण 27 कोटी आहोत. प्रत्येकवेळी आपलाच वापर झाला आहे. पण जेव्हा सत्तेचा प्रश्‍न येतो, तेव्हा नागपूरवाला समोर येतो, असे का होते? याचा विचार करा. आपल्याला भिक मागायची गरज नाही, मराठे संघटना, गटतटामध्ये विखुरले गेले आहेत. एकत्र आलो तर शंभर टक्के आरक्षण मिळेल. कर्जमाफीही होईल. याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

सुरवातीला हार्दिक पटेल यांना मराठा मित्र पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावर बोलताना ते म्हणाले, मी तुमचा मित्र नाही तर बंधू आहे. आपण सर्व एकत्र येऊन सत्ताधार्‍यांना धडा शिकवू. गोरों से आझादी ले ली, सालो चोरे मे आकर अटक गये, अशा शब्दांत त्यांनी फडणवीस आणि मोदी सरकारवर टीका केली. शेतकरी आत्महत्यांच्या घटनांवर त्यांनी प्रश्‍न उपस्थित केले. आपल्या मागण्यांसाठी नाशिकहून पायी गेलेल्या शेतकर्‍यांना दिलेल्या आश्‍वासनांचे काय झाले, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. 

छत्रपतींना नाकारणारे आज सत्तेत 

शिवस्मारक बनवण्याचे स्वप्न दाखवून आपल्याला चॉकलेट दाखवण्याचे काम केले जात आहे. शिवाजी महाराजांना मूर्तीमध्ये नव्हे तर मनामध्ये बसवा. छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यांनी राज्याभिषेक केला नाही, ते आज आमच्यावर राज्य करत आहेत, या नागपूरवाल्यांची भिती बाळगू नका. स्वतःला मजबूत करा, आपल्याला कुणाच्याही मदतीची गरज नाही, असे आवाहनही हार्दिक पटेल यांनी केले. 

अधिवेशनातील ठराव

मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द झालाच पाहिजे. शेतकर्‍यांना पेन्शन योजना आणि शेतीमालाला हमीभाव द्यावा. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळास एक हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा. संपूर्ण महाराष्ट्रात दारुबंदी करावी.