होमपेज › Aurangabad › कचर्‍याच्या जनजागृतीला गुरुजींची दांडी

कचर्‍याच्या जनजागृतीला गुरुजींची दांडी

Published On: Apr 26 2018 1:24AM | Last Updated: Apr 26 2018 12:44AMऔरंगाबाद : राहुल जांगडे

 काही केल्या शहराची कचराकोंडी फुटण्याची चिन्हे दिसत नसल्याने समाज घडविणार्‍या शिक्षकांना यात सहभागी करून घेण्याचे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी चार दिवसांपूर्वी प्रशासनाला दिले. त्याप्रमाणे मनपाच्या 460 शिक्षकांवर जनजागृतीची विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र, यापैकी जवळपास दहा ते वीस टक्के शिक्षक विविध कारणांचे दाखले देत कचर्‍याच्या जनजागृतीला दांडी मारत असल्याचे दै. पुढारीच्या पाहणीत समोर आले आहे.

नारेगाव ग्रामस्थांच्या प्रचंड विरोधानंतर तब्बल 69 दिवसांपासून संपूर्ण शहराची कचराकोंडी झालेली आहे. मनपा प्रशासन आणि पदाधिकार्‍यांकडून केेलेले बहुतांश उपाय कचराकोंडीसमोर कुचकामी ठरले आहेत. वारंवार आव्हान करूनही शहरातील अनेक भागात रस्त्यावरच कचरा टाकण्याचे प्रमाण बंद झालेले नाही. मनपाच्या गाड्यांनी रस्त्यावरील कचरा उचलताच दोन दिवसांत त्याच जागी पुन्हा कचर्‍याचे ढीग लागत आहेत. काही वॉर्डांत अद्यापही कचर्‍याचे वर्गीकरण, विल्हेवाट केली जात नसल्याने कचराकोंडीची समस्या सुटलेली नाही. त्यामुळे महापौर नंदकुमार घोडेले यांनी मनपा शाळेच्या शिक्षकांमार्फत नागरिकांचे प्रबोधन करावे, असे आदेश प्रशासनाला दिले होते. 

शिक्षकांनी त्यांच्या परिसरात फिरून नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व सांगावे. ओला-सुका व इतर कचरा असे वर्गीकरण कसे करावे, त्याचे महत्त्व पटवून द्यावे. कचर्‍यापासून खत तयार करणे, रस्त्यावर कचरा न टाकता मनपा घंटागाड्यांना देणे आदी जनजागृतीची कामे करावी अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या. यासाठी सर्व शिक्षकांनी जनजागृतीची कामे करावीत, असे निर्देश देण्यात आले. त्यानंतर मागील पाच दिवसांपासून शहरातील वॉर्डांमध्ये शिक्षकांकडून कच-यासंबंधी जनजागृती केली जात आहे. मात्र, काही शिक्षक आजारपण, लग्नकार्य, इतर नाना कारणे देत या कामाला दांडी मारली जात आहे. याचे प्रमाण जवळपास वीस टक्के असल्याचे शिक्षणाधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

ज्ञानदान करणे हे शिक्षकांचे प्रथम कर्तव्य आहे. त्यासोबतच वेळोवेळी जनगणना आणि निवडणुकीमध्ये शिक्षकांना विशेष कर्तव्य बजावे लागते. अपवाद कारणे सोडल्यास शासनाने दिलेली जबाबदारी शिक्षकांना पार पाडावीच लागते. मात्र, आता शहराच्या कचर्‍याचे ओझेच मनपा शाळेच्या शिक्षकांच्या खांद्यावर टाकण्यात आले आहे. त्यामुळे एका शिक्षिकेने थेट महापौरांसमोरच उघड-उघड नाराजी व्यक्‍त केली होती. त्यामुळे महापौरांनी त्या शिक्षिकेस सक्‍तीच्या रजेवर पाठविण्याचे आदेशही दिले होते. नंतर त्या शिक्षिकेच्या विनंतीवरून तो निर्णय मागे घेण्यात आला. 

Tags : Aurangabad, guruji, absent, trash, public, awareness