Mon, Jun 24, 2019 17:37होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : मराठा आरक्षणसाठी शिऊर ग्रामपंचायतीच्या १३ सदस्यांचे राजीनामे

औरंगाबाद : मराठा आरक्षणसाठी शिऊर ग्रामपंचायतीच्या १३ सदस्यांचे राजीनामे

Published On: Jul 26 2018 8:51PM | Last Updated: Jul 26 2018 8:50PMशिऊर : सौरभ लाखे 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी शिऊर येथील १३ ग्रामपंचायत सदस्यांनी आपल्या सद्सत्वाचे राजीनामे सरपंच नितीन चुडीवाल यांच्याकडे गुरुवार दि २६ रोजी सुपूर्द केले. तर भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष एकनाथराव जाधव यांनी देखील भाजपा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे पाठविला आहे. 

वैजापूर तालुक्यातील सर्वात मोठे गाव असणाऱ्या शिऊर मध्ये १७ सदस्यीय ग्रामपंचायत आहे या पैकी १३ सदस्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहे. उपसरपंच जाकिर सैययद, माजी सरपंच अशोकराव जाधव, सुलोचनाबाई पैठणपगारे, माजी उपसरपंच गिरीश भावसार, नंदू जाधव, नवनाथ आढाव, चेतन दिवेकर, निलकमल चुडीवाल, वैशाली देशमुख, राजश्री जाधव, ज्योती जाधव, मंगल पवार, सुनीता चव्हाण यांनी आपल्या ग्रामपंचायत सदस्यपदाचा राजीनामा सरपंच नितीन चुडीवाल यांच्याकडे सोपविला आहे. 

मराठा आरक्षणासाठी सरपंच या नात्याने माझा देखील पाठिंबा आहे. शिऊर ग्रामपंचायतचे तेरा सदस्यांनी माझ्याकडे राजीनामा दिला आहे. सदर राजीनाम्या करिता विशेष बैठक बोलावुन पडताळणी करण्यात येईल आणि नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल असे सरपंच नितीन चुडीवाल यांनी सांगितले.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भागीनाथ मगर, वैजापूर खरेदी विक्री संघाचे संचालक राजेंद्र मगर, युवक काँग्रेस वैजापूरचे अध्यक्ष उमेश नाईकवाडी, यांच्यासह खंडाळा येथील आठ ग्रामपंचायत सदस्यांनी आपले राजीनामे दिले आहेत.

भाजपा पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

भाजपा जिल्हाध्यक्ष एकनाथराव जाधव यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्याकडे पाठविल्यानंतर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी देखील आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत.  भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा चिटणीस रामेश्वर जाधव, तालुका सरचिटणीस केतन आव्हाळे, किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष साहेबराव थोरात, तालुका चिटणीस प्रशांत झाल्टे,  सोशल मीडियाचे संदेश जाधव यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा वरिष्ठकडे पाठवले आहे. दरम्यान एकनाथराव जाधव यांच्यासोबत दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.