होमपेज › Aurangabad › सावधान! सोने उजळून देण्याच्या नावाखाली गंडविणारी टोळी शहरात

सावधान! सोने उजळून देण्याच्या नावाखाली गंडविणारी टोळी शहरात

Published On: Feb 24 2018 1:36AM | Last Updated: Feb 24 2018 1:36AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

‘आम्ही पतंजलीकडून आलो आहोत. सोन्याचे दागिने उजळून देण्याची पावडर आणली आहे’ अशी थाप मारून सासू-सुनेचे अडीच तोळे दागिने हातचलाखीने लंपास करणार्‍या दोन भामट्यांविरुद्ध छावणी ठाण्यात गुन्हा नोंद झाला. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच उल्कानगरीत एका वृद्धेला दोन भामट्यांनी 45 हजार रुपयांना चुना लावला होता. त्यामुळे शहरात फसवणूक करणारी टोळी सक्रिय असण्याची शक्यता आहे. महिलांनी यापुढे अनोळखी व्यक्‍तींच्या हातात दागिने देऊ नयेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उमाबाई श्यामलाल खांडेकर (60, रा. गवळीपुरा, छावणी) या व त्यांची सून 21 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते साडेदहा वाजेच्या सुमारास घरी होत्या. दोघे अनोळखी 25 ते 26 वर्षांचे तरुण दुचाकीवरून त्यांच्या घरी आले. त्यांनी उमाबाई यांना पतंजलीकडून आल्याची थाप मारून आता पतंजलीने सोन्याचे दागिने उजळून देण्याची पावडर काढल्याचे सांगितले. सोबत ती कशी वापरायची, हे दाखवितो म्हणून त्यांचा विश्‍वास संपादन केला. तसेच त्यांना दागिने देण्यास सांगितले. त्यानंतर उमाबाई यांनी स्वतःसह सुनेची गळ्यातील चेन, अंगठी, कानातील फुले असे अडीच तोळ्यांचे दागिने त्यांच्या हवाली केले. त्यानंतर आरोपींनी हळदीसारख्या पावडरचे पाणी केले. त्यात दागिने टाकल्याचे भासवून हातचलाखीने सर्व अडीच तोळे दागिने लुबाडले. तसेच, थाप मारून तेथून पोबारा केला. दरम्यान, फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर बराच उशीर झालेला होता. त्यावर उमाबाई खांडेकर यांनी छावणी ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली. या प्रकरणाचा अधिक तपास उपनिरीक्षक सचिन मिरधे करीत आहेत.

एका तासात दोन ठिकाणी डल्ला

सोन्याचे दागिने उजळून देतो, अशी थाप मारून दोन भामट्यांनी महिलांना गंडविण्याची पहिली घटना उल्कानगरीत घडली होती.  21 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते 11.15 वाजेच्या सुमारास सुलभा विजय कुलकर्णी यांचे 45 हजार रुपयांचे दागिने लंपास करण्यात आले होते. दरम्यान, त्याच दिवशी सकाळी 10 वाजेच्या सुमारास भामट्यांनी छावणीतील गवळीपुर्‍यात उमाबाई खांडेकर यांनाही फसविल्याचे समोर आले. कदाचित दोन्ही घटनांतील आरोपी एकच असण्याची शक्यता आहे.