Sun, Apr 21, 2019 01:52होमपेज › Aurangabad › गोळीबार करीत लूट सराफासह दोन जखमी 

गोळीबार करीत लूट सराफासह दोन जखमी 

Published On: Apr 21 2018 12:00AM | Last Updated: Apr 21 2018 12:00AMपळशी: प्रतिनिधी

सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव येथून आपले दुकान बंद करून सिल्लोडकडे येत असलेल्या व्यापार्‍यावर पिस्तूलधारी दोघांनी प्राणघातक हल्ला करीत त्याच्याजवळील 12 तोळे सोने, एक किलो चांदी व 90 हजार रुपये रोख असा लाखो रुपयांचा ऐवज दोघांनी लुटला. विशेष म्हणजे यावेळी व्यापार्‍याच्या बचावासाठी आलेल्या एका जणावर लुटारूंनी चक्‍क गोळीबार केला. ही खळबळजनक घटना  रात्री सव्वासात वाजेच्या सुमारास घडली. ऐवज लुटून दोन्ही लुटारू पसार झाले. 

या हल्ल्यात डोक्यात प्रहार केल्याने सराफा व्यापारी सुनील ऊर्फ विजय दुळकीकर (40, रा. टिळकनगर, सिल्लोड) व बचावासाठी आलेले नामदेव नारायण मुळे (51, रा. गोळेगाव) हे पायावर गोळ्या लागल्याने गंभीर जखमी झाले. दोघांनाही उपचारासाठी सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितलेे की, गोळेगाव येथील राज ज्वेलर्सचे मालक सुनील दुळकीकर यांनी नित्याप्रमाणे शुक्रवारी रात्री आपले दुकान बंद केले. दुकानातील 12 तोळे सोने, एक किलो चांदी व गल्ल्यातील 90 हजार रोख असा ऐवज त्यांनी बॅगमध्ये भरला आणि ते दुचाकीवर (क्र. एमएच- 20- ईएच- 3084) बसून सिल्लोडला घरी जाण्यासाठी निघाले. ते काही अंतर पुढे आले. गोळेगाव येथील बीएसएनएल कार्यालयासमोर अचानक एका दुचाकीवर दोन अनोळखी व्यक्‍ती त्यांना आडवे आले. त्यांनी दुळकीकर यांना थांबविण्याचा प्रयत्न केला; परंतु ते थांबत नाहीत हे पाहून आरोपींनी पाठलाग करून त्यांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न सुरू केला. ते बॅग सोडेनात. तेव्हा दुचाकीवर मागे बसलेल्या आरोपीने दुळकीकर यांच्या डोक्यावर काही तरी धारधार वस्तूने जोरदार प्रहार केला. त्यामुळे दुळकीकर खाली कोसळले. तीच संधी साधून आरोपींनी त्यांची बॅग हिसकावली. 

थेट पायावर केला गोळीबार

ही लूट सुरू असतानाच गावातील नामदेव मुळे हे सिल्लोडहून एका लग्न समारंभाहून दुचाकीवर परतत होते. त्यांची लुटीची घटना पाहताच तिकडे धाव घेतली आणि आरोपींना रोखण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी अचानक एका आरोपीने पिस्तूल काढले आणि मुळे यांच्या पायावर गोळ्या झाडल्या. त्यामुळे क्षणातच मुळेही खाली कोसळले. त्यानंतर आरोपींनी सोने-चांदीचा ऐवज व रोकड असलेली बॅग घेऊन तेथून धूम ठोकली. या गोंधळाने गावातील नागरिक धावत आले. मग भाजपचे सुरेश बनकर यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोन्ही जखमींना तातडीने उपचारासाठी सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात हलविले. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश बिराजदार, अजिंठा ठाण्याचे सहायक निरीक्षक दिनेश आहेर यांनी सहकार्‍यांसह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना तेथे गोळीची केस (पुंगळी) सापडली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या शोधार्थ सर्वत्र नाकाबंदी करून शोध सुरू केला. रात्री उशिरापर्यंत आरोपींचा काहीही तपास लागला नव्हता. दरम्यान, नगराध्यक्ष अब्दुल समीर, रामदास पालोदकर, नंदकिशोर सहारे यांच्यासह अनेकांनी जखमींची भेट घेऊन आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली. 

तीन वेळा झाला होता लुटीचा प्रयत्न

सराफा व्यापारी सुनील दुळकीकर यांचे ज्येष्ठ बंधू संजय दुळकीकर यांचे उंडणगाव येथे ज्वेलर्सचे दुकान आहे. त्यांना तीन वेळा अशाच पद्धतीने लुटण्याचा प्रयत्न झाला होता; परंतु तिन्ही वेळा त्यांनी हातातील सोने-चांदीच्या दागिन्यांनी भरलेली बॅग सोडली नाही. त्यामुळे ऐवज वाचला होता, असे या घटनेत जखमी झालेले सुनील दुळकीकर यांनी सांगितले. या रस्त्यावर पोलिसांची गस्त वाढविण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. 


पिस्तूल गावठी की छर्र्‍याचे!

दुळकीकर यांना लुटण्यासाठी आरोपींनी वापरलेले पिस्तूल हे गावठी की छर्र्‍याचे याचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलिसांना घटनास्थळी सापडलेल्या गोळीच्या पुंगळीवरून ते गावठी पिस्तूल असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे.