Sun, Jul 21, 2019 02:07होमपेज › Aurangabad › छेडछाडीला कंटाळून तरूणीची आत्महत्या

छेडछाडीला कंटाळून तरूणीची आत्महत्या

Published On: Feb 14 2018 2:50AM | Last Updated: Feb 14 2018 2:21AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

एकतर्फी प्रेमातून तरुणाकडून सुरू असलेल्या त्रासाला कंटाळलेल्या विद्यार्थिनीने विष पिऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना गारखेडा परिसरातील भारतनगरात घडली. ज्योती शेषराव साळवे (18, रा. भारतनगर) असे तिचे नाव आहे. तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या अमोल अशोक दाभाडे (रा. भारतनगर) याच्याविरुद्ध पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योती साळवे ही राजामाता जिजाऊ हायस्कूलमध्ये बारावी विज्ञान शाखेत शिकत होती. गेल्या एक वर्षापासून तिच्या घराजवळच भारतनगरमध्ये राहणारा अमोल  दाभाडे हा तिच्या मागे लागलेला होता. तो तिच्या प्रेमात पडला होता. ती महाविद्यालयात जात असताना दाभाडे तिला अडवून प्रेमाचा प्रस्ताव स्वीकारण्यासाठी दबाव टाकत होता. त्याने अनेकदा तिच्यासमोर प्रेमाचा प्रस्ताव मांडला. ज्योतीने त्याला झिडकारले. त्यामुळे अमोल तिला जास्तच त्रास देऊ लागला होता. त्याच्या त्रासाला वैतागलेल्या ज्योतीने अखेर हा प्रकार आपल्या घरात सांगितला. त्यानंतर घरच्यांनी त्याच्याविरुद्ध पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.

पोलिसांनी अमोलला कडक समज दिल्याने तो काही दिवस शांत बसला. मात्र त्याने पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केल्यानंतर नातेवाइकांनी पुन्हा तक्रार केली. यावेळी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध कारवाई केली होती. त्यानंतरही तो शांत बसला नाही. त्याने त्रास देणे सुरूच ठेवले. पोलिस माझे काही करू शकत नाहीत, असे म्हणत गेल्या 1 फेबु्रवारीपासून अधिकच त्रास देऊ लागला. ज्योतीच्या घरच्यांना देखील धमक्या देत होता. अखेर नेहमी होत असलेल्या त्रासाला कंटाळून ज्योतीने 8 फेब्रुवारीला मध्यरात्री आपल्या राहत्या घरात विषारी औषध प्राशन केले. हा प्रकार सकाळी घरातील लोकांच्या लक्षात आल्याने तिच्या मामाने तत्काळ तिला घाटी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना मंगळवारी पहाटे साडे पाच वाजता तिचा मृत्यू झाला.या प्रकरणी ज्योतीची आई मुक्ताबाई शेषराव साळवे यांनी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात अमोल दाभाडेविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक अशोक आव्हाड हे तपास करत आहेत.

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार
ज्योती साळवे हिचा सकाळी मृत्यू झाल्यानंतर पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक पवार व हवालदार हिंगे हे शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी घाटी रुग्णालयात आले. ज्योतीचे शवविच्छेदन झाल्यानंतर नातेवाइकांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. पोलिसांनी त्यांना समजावून देखील ते ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. अखेर पोलिसांनी ज्योतीचा अगोदर अंत्यविधी करा, त्यानंतर गुन्हा दाखल करण्याचा शब्द दिला. त्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला.

तरुणींना नेहमीच त्रास
गारखेडा भागातील भारतनगर भागात रस्त्याने येणार्‍या-जाणार्‍या महाविद्यालयीन व शाळेच्या तरुणींना टपोरी मुले हे नेहमीच त्रास देत असतात. त्यांच्याविरुद्ध ठाण्यात तक्रार दिली तरी ते काही दिवस दिसत नाहीत. मात्र पुन्हा त्रास देत असतात. हा त्रास देण्यातुूनच मागे एका तरुणीची छेड काढणार्‍या तरुणास रिक्षातून आलेल्या तरुणांनी बेदम मारहाण केली होती. त्यात त्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पोलिसांनी अशा टपोरींवर कारवाई करण्याची मागणी ज्योतीचे मामा संतोष निकाळजे यांनी केली आहे.