Sun, Aug 25, 2019 23:26होमपेज › Aurangabad › पिशोर येथे तरुणीची आत्महत्या

पिशोर येथे तरुणीची आत्महत्या

Published On: Jan 11 2018 1:38AM | Last Updated: Jan 11 2018 1:31AM

बुकमार्क करा
पिशोर : प्रतिनिधी

येथील एका अविवाहित तरुणीने स्वत:च्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि.9) सायंकाळी साडेपाच वाजेदरम्यान उघडकीस आली. चैताली रमेश वाघ (28) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पिशोर येथील दिगर भागात ग्रामपंचायत कार्यालयाच्या मागच्या गल्‍लीत चैताली ही आपली लहान बहीण व आजी सोबत राहात होती. मंगळवारी लहान बहीण ही टंकलेखनाच्या क्‍लासला आणि आजी आठवडी बाजारात गेलेली असताना चैतलीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. पोलिस पाटील तुषार काकुळते यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. सहायक पोलिस निरीक्षक अभिजित मोरे, पो.कॉ. के.टी. वाघ आदींनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. घटनास्थळी पोलिसांना सुसाईड नोट सापडली आहे. त्यात राजेश अनंतराव कांबळे (मुळगाव पाथर्डी ह.मु. सावंगी, औरंगाबाद) याच्याशी प्रेमसंबंध असल्याचे तसेच राजेशने लग्‍नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे म्हटले आहे. राजेशची पत्नी जयश्री हीने त्यास मदत केल्याचाही यात उल्लेख आहे. 

मृत तरुणीचे वडील रमेश वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजेश आणि जयश्री कांबळे यांनी चैतालीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपी फरार झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले. बुधवारी सकाळी पिशोर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदानंतर पोलिसांनी तरुणीचा मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन केला. वनगाव (ता.सोयगाव) येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक मोरे करीत आहेत.