Tue, Jul 16, 2019 09:41होमपेज › Aurangabad › अभ्यासाच्या ताणामुळे परीक्षेपूर्वी त्याने सोडले घर

'अभ्यासाचा ताण आलाय, मला माफ करा'

Published On: Feb 22 2018 9:23AM | Last Updated: Feb 22 2018 9:46AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

गतवर्षी अपघातामुळे बारावीची परीक्षा देता आली नव्हती. तर, यंदा अभ्यास पूर्ण झाला नव्हता. सलग दोन वर्षे बारावीत राहून गुण कमी मिळाले तर आई-वडिलांना काय उत्तर देणार? हा प्रश्‍न सुटत नसल्यामुळे ‘त्याने’ चक्‍क घरातून गायब होण्याचा निर्णय घेतला. परीक्षेच्या दिवशी भल्या पहाटे चार वाजता स्वतःच्या खोलीत ‘मला माफ करा’ असे पत्र ठेवून तो दोन ड्रेस बॅगमध्ये भरून बसस्थानकावर जाऊन बसला. वेळीच पोलिसांना ही माहिती मिळाली. त्यामुळे त्याचा शोध घेता आला. पण, यंदा पुन्हा त्याची परीक्षा हुकली.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अजित (नाव बदललेले आहे) हा 19 वर्षीय विद्यार्थी उच्चभ्रू कुटुंबातील असून बन्सीलालनगरमध्ये राहतो. त्याचे वडील  उच्चपदस्थ अधिकारी आहेत. छोटा भाऊ दहावीला असून अजित विद्याधाम सायन्स ज्युनिअर कॉलेजमध्ये बारावीला आहे. गतवर्षी ऐन परीक्षेच्या कालावधीत अपघात झाल्यामुळे त्यामुळे तो बारावीच्या परीक्षेला मुकला होता, परंतु आई-वडिलांच्या मार्गदर्शनात त्याने जुने सर्व विसरून यंदा पुन्हा बारावीला प्रवेश घेतला. परंतु, अजितची अभ्यासाची तयारी पूर्ण झाली नाही. विद्याधाम कॉलेजबरोबरच शहरातील एका नामांकित शिकवणीत तो शिकला, परंतु मनाने आधीच खचून गेलेला अजित अखेर परीक्षेला सामोरे जाण्यात कमी पडला. दोन वर्षे बारावीत घालवून जर कमी गुण मिळाले तर आई-वडील, समाज, नातेवाइकांना काय उत्तर देणार? असा प्रश्‍न त्याच्या मनात घर करून राहिला. अगदी परीक्षेच्या दिवशीपर्यंत त्याला या प्रश्‍नाचे उत्तर शोधता आले नाही. त्यामुळे 11 वाजता इंग्रजीचा पेपर असताना त्याने पहाटे 4 वाजता घरात चिठ्ठी लिहून ठेवली. बॅगमध्ये दोन ड्रेस भरले असून घरातून गायब होण्याचा निर्णय घेतला. 

अभ्यासात हुशार असूनही...

अजित (नाव बदललेले आहे) हा अभ्यासात हुशार आहे. दहावीला त्याला 87 टक्के गुण मिळालेले आहेत. परंतु, बारावीच्या ऐन परीक्षेच्या काळात झालेल्या अपघातामुळे तो प्रचंड तणावाखाली गेला आहे. 

आई-वडिलांची पोलिसांकडे धाव

बुधवारी (दि. 21) अजितचा बारावीचा पहिला पेपर असल्याने घरातील सदस्य त्याला उठविण्यासाठी गेले. तर खोली बाहेरून बंद होती. दरवाजा उघडून आत पाहिले तर अजित खोलीत नव्हता. परंतु, त्याने लिहून ठेवलेले पत्र आढळून आले. ‘मला अभ्यासाचा ताण आला आहे. माझी परीक्षेची तयारी झालेली नाही. त्यामुळे मी खूप तणावात आहे. मला माफ करा’ अशी चार वाक्यांची चिठ्ठी ठेवून तो गायब झाला होता. हा प्रकार समोर आल्यावर अजितच्या आई-वडिलांनी वेदांतनगर पोलिसांकडे धाव घेतली. पोलिस निरीक्षक अनिल आडे यांनी बेपत्ताची तक्रार नोंदवत लगेचच तपासाला सुरुवात केली. उपनिरीक्षक वर्षाराणी आजले यांच्या पथकाने मोबाइल लोकेशन काढण्याचा प्रयत्न केला. पण, त्याचा मोबाइल बंद होता. दरम्यान, शोध मोहीम सुरू असताना दुपारी 12 वाजता तो मध्यवर्ती बसस्थानकात आढळून आला.