Sat, Apr 20, 2019 18:31होमपेज › Aurangabad › विद्यार्थिनीने विष घेतल्याचे  कळताच ‘तो’ तरुण पसार

लग्न कर म्हणणारा ‘तिचा’ मृत्यू झाल्याचे कळताच पसार

Published On: Feb 15 2018 10:41AM | Last Updated: Feb 15 2018 10:41AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

एकतर्फी प्रेमातून तरुणाकडून सुरू असलेल्या त्रासाला कंटाळलेल्या विद्यार्थिनीने विष घेतल्याचे कळताच ‘तो’ तरुण पसार झाला. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, पोलिसांनी बुधवारी सकाळी विद्यार्थिनीच्या घरातील घटनास्थळाचा पंचनामा करून विषाची बाटली जप्त केली.

गारखेडा परिसरातील भारतनगर येथे राहणारी ज्योती शेषराव साळवे (18) ही विद्यार्थिनी महाविद्यालयात येत-जात असताना तिच्या घराजवळच राहणारा अमोल अशोक दाभाडे हा तरुण वर्षभरापासून एकतर्फी प्रेमातून माझ्याशी लग्न कर, आपण पळून जाऊ असे म्हणून त्रास देत होता. मात्र तरुणीने त्याचा प्रस्ताव धुडकावून लावल्याने तो दररोज तिचा पाठलाग करून त्रास देत होता. याबाबत तरूणीने आपल्या घरी हा प्रकार सांगितल्यानंतर पालकांनी पुंडलिकनगर भागात दोन वेळा त्याच्याविरुद्ध तक्रार दिली होती.

वाचा : जयपूरमध्ये एकतर्फी प्रेमातून तरुणीवर अ‍ॅसिड हल्‍ला 

मात्र काही दिवस शांत बसल्यावर तो पुन्हा त्रास देत असे. अखेर त्याच्या या त्रासाला कंटाळून ज्योतीने 9 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता घरात उंदिर मारण्याचे औषध प्राशन केले. तिच्यावर उपचार सुरू असताना मंगळवारी पहाटे घाटीत मृत्यूू झाला. या प्रकरणी तिच्या आईने सायंकाळी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अमोलविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

आरोपी लवकरच सापडेल; पोलिसांना विश्‍वास

ज्योतीने घरात विष घेतल्याचे कळताच अमोल हा त्या दिवसापासूनच शहरातूून पसार झाला आहे. बुधवारी सकाळी पोलिसांनी त्याच्या घरी चौकशी केली असता तो वाहनचालक असल्याने सध्या यवतमाळ येथे गेला असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. त्यामुळे पोलिस सध्या त्याच्या मागावर आहेत. तो लवकरच सापडेल असा विश्‍वास पोलिसांनी व्यक्‍त केला. दरम्यान, पोलिसांनी ज्योतीने ज्या रूममध्ये विष घेतले त्याचा पंचनामा केला असता विषाची बाटली सापडली आहे. शवविच्छेदनात व घरी सापडलेले विष एकच आहे का हे तपासण्यासाठी न्यायवैद्यक विभागाकडे पाठविण्यात येणार असल्याचे  सहायक निरीक्षक अशोक आव्हाड यांनी सांगितले.