Wed, Apr 24, 2019 01:44होमपेज › Aurangabad › तर उडाला असता रेल्वेचा पूल; मोठा अनर्थ टळला!

तर उडाला असता रेल्वेचा पूल; मोठा अनर्थ टळला!

Published On: Dec 27 2017 12:14PM | Last Updated: Dec 27 2017 12:14PM

बुकमार्क करा
करमाड : प्रतिनिधी

जालना रोडवरील टाकळीत गॅस सिलिंडरचा  पुरवठा करून येणार्‍या धावत्या छोटा हत्ती वाहनाने रेल्वे उड्डाणपुलाखालीच अचानक पेट घेतला. विशेष म्हणजे, पटरीची तपासणी सुरू असतानाच रेल्वेच्या  अधिकार्‍यांसमोर मंगळवारी (दि. 26) सायंकाळी 5  वाजता ही घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली. यात छोटा हत्ती वाहनाचे केबिन जळाले असून अग्निशामक दलाच्या दोन गाड्या वेळीच पोहोचल्यामुळे मोठा अनर्थ  टळला.

या वाहनात भरलेले चार तर रिकामे 24 सिलिंडर होते. सिलिंडरने पेट घेतला असता तर पुलाखाली मोठा स्फोट झाला असता. मनपा अग्निशामक दलाचे प्रमुख राजू  सुरे यांच्याकडून  मिळालेल्या माहितीनुसार, चिकलठाण्यातील भारत गॅसच्या योगेश्‍वरी गॅस एजन्सीतून छोटा हत्ती (क्र. एमएच 20, ईजी 3459) वाहन मंगळवारी टाकळी येथे सिलिंडरचा पुरवठा करण्यासाठी गेले होते. यात 28  सिलिंडर होते. यातील 4 ते 5 सिलिंडर भरलेले व इतर रिकामे होते.

दरम्यान, सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास हे वाहन जालना रोडवर येण्यासाठी टाकळी शिवारातील रेल्वे उड्डाणपुलाखालून येत असताना त्याने अचानक पेट  घेतला. हा प्रकार चालक अलीम शेख यांच्या लक्षात  येताच त्यांनी पुलाखालीच वाहन थांबविले. त्यांनी अग्‍निशामक दलाला माहिती देताच शेंद्रा एमआयडीसी  आणि मनपाच्या अग्निशामक दलातून दोन बंब पाठविण्यात आले. त्यांनी वेळीच आग आटोक्यात आणल्यामुळे सुदैवाने भरलेल्या सिलिंडरने पेट घेतला नाही. त्यामुळे  मोठा  अनर्थ टळला, परंतु छोटा हत्ती वाहनाचे केबिन जळून खाक झाले.

तर उडाला असता रेल्वेचा पूल 

या छोटा हत्तीमध्ये भरलेले गॅस सिलिंडर होते. विशेष म्हणजे ही घटना रेल्वे उड्डाण पुलाच्या खाली घडली. दुर्दैवाने सिलिंडरचा स्फोट झाला असता तर हा रेल्वे पुलालाही धोका निर्माण झाला असता. घटनेच्या दरम्यानच या पुलावरून रेल्वे येणार होत्या हे विशेष...  

रेल्वे झाली सतर्क

गॅस सिलिंडरच्या वाहनाने पेट घेतल्याचे समजल्यावर सचखंड आणि हायकोर्ट एक्स्प्रेस या दोन रेल्वे  थांबविण्याच्या सूचना केल्या होत्या, परंतु, सहा वाजण्यापूर्वीच आग आटोक्यात  आली. तसेच, कुठलाही धोका नसल्याचे समजल्यामुळे रेल्वे थांबविण्याची गरज पडली नाही. - एल. के. जाखडे,  स्टेशन  मास्तर, औरंगाबाद ...