होमपेज › Aurangabad › बेगमपुर्‍यात चायनिज हॉटेलवर गुंडांचा धुडगूस

बेगमपुर्‍यात चायनिज हॉटेलवर गुंडांचा धुडगूस

Published On: Feb 12 2018 1:48AM | Last Updated: Feb 12 2018 1:03AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

9 फेब्रुवारीच्या रात्री बेगमपुर्‍यातील हिंद चायनिज हॉटेलवर जेवण करून बिल न देता निघून गेलेल्या गुंडांनी दुसर्‍या दिवशी हॉटेलवर धुडगूस घातला. आम्हाला ओळखत नाही का?, आमच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करतो का म्हणत या गुंडांनी लोखंडी रॉडने एकाचे डोके फोडले. या प्रकरणी जीवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून आठ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.

पोलिस निरीक्षक जयश्री आडे यांनी सांगितले की, शेख अकबर शेख गबरू (35, रा. गवळीपुरा) यांचे जयसिंगपुर्‍यात हिंद चायनिज नावाने हॉटेल आहे. 9 फेबु्रवारी रोजी बाल पठाडे, शुभम, मंगेश, राज (पूर्ण नावे समजू शकली नाहीत) हे जेवणासाठी आले. त्यांनी बिल दिले नाही. त्यावरून शेख यांचा भाऊ अर्शदशी त्यांची बाचाबाची झाली होती. दरम्यान, दुसर्‍या दिवशी 10 फेब्रुवारीला रात्री साडेनऊ वाजता आरोपी बाल पठाडे, शुभम, मंगेश, राज, गिरी’ पाटील, सागर व इतर तीन ते चार असे आठ ते दहा जण पुन्हा हॉटेलवर आले. त्यांनी हॉटेलमालक शेख यांच्याशी हुज्जत घातली. आमच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करतो का? म्हणून त्यांनी शिवीगाळ करून हॉटेलमध्ये धुडगूस घालत साहित्याची तोडफोड केली. तसेच, आरोपी बाल पठाडे याने लोखंडी रॉडने अर्शदचे डोके फोडले.