Tue, Mar 19, 2019 21:04होमपेज › Aurangabad › डॉ. पानतावणे यांचा पद्मश्री पुरस्कार नातेवाइकांकडे सुपूर्द

डॉ. पानतावणे यांचा पद्मश्री पुरस्कार नातेवाइकांकडे सुपूर्द

Published On: Jun 28 2018 1:32AM | Last Updated: Jun 28 2018 1:17AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

पहिल्या मराठी विश्‍व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, अस्मितादर्श चळवळीचे जनक, ज्येष्ठ विचारवंत, लेखक दिवंगत डॉ. गंगाधर पानतावणे यांना शासनाने 25 जानेवारी 2018 रोजी जाहीर केलेला पद्मश्री पुरस्कार त्यांच्या नातेवाइकांकडे बुधवारी (दि.27) विभागीय आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सुपूर्द केला. डॉ. पानतावणे यांच्या मुली नंदिता व निवेदिता यांनी तो स्वीकारला. 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते हा पुरस्कार डॉ. पानतावणे यांना 21 मार्च 2018 रोजी वितरित करण्यात येणार होता, परंतु आजारपणामुळे पुरस्कार स्वीकारण्यासाठी डॉ. पानतावणे उपस्थित राहू शकले नाहीत. त्यानंतर 27 मार्च 2018 रोजी त्यांचे निधन झाले. म्हणून हा पुरस्कार स्वत: विभागीय आयुक्‍त डॉ. भापकर, जिल्हाधिकारी चौधरी यांनी डॉ. पानतावणे यांच्या घरी जाऊन सन्मानाने सुपूर्द केला. 

यावेळी डॉ. पानतावणे यांचे कुटुंबीय, मिलिंद अवसरमल, अमोल वाघमारे, एम. डी. बनकर, करुण भगत, प्रमोद खोब्रागडे, प्रा. लेखचंद मेश्राम, अजय आठवले, प्रभाकर पानतावणे तसेच उपजिल्हाधिकारी रीता मैत्रेवार, शिवाजी शिंदे, तहसीलदार राजू शिंदे, अपर तहसीलदार रमेश मुंडलोड यांची उपस्थिती होती.