Sun, Nov 17, 2019 09:18होमपेज › Aurangabad › पानतावणे अनंतात विलीन

पानतावणे अनंतात विलीन

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

पहिल्या विश्‍व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे यांचे मंगळवारी पहाटे निधन झाले. त्यांच्यावर छावणी येथील स्मशानभूमीत सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी बंदुकीच्या तीन फैरी झाडून त्यांना सलामी देण्यात आली. नंदिता आणि निवेदिता या त्यांच्या दोन्ही मुलींनी त्यांना अग्नी दिला. 

नागसेनवन परिसरातील श्रावस्ती या त्यांच्या निवासस्थानी सायंकाळी साडेसहा वाजता बुद्धवंदना झाल्यानंतर त्यांची अंत्ययात्रा निघाली. गुलाबाच्या फुलांनी सजवलेल्या मोठ्या ट्रकवर डॉ. पानतावणे यांचे पार्थिव ठेवण्यात आले. ट्रकच्या समोर डॉ. पानतावणे यांचे भव्य छायाचित्र लावले होते. अंत्ययात्रेत साहित्य, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील, तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  केंद्रीय मंत्री रामदास आठवले, रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष बाबूराव कदम, मिलिंद शेळके, चंद्रभान पारखे, रावसाहेब कसबे, रा. रं. बोराडे, ल. भा. रायमाने, प्राचार्य इंद्रजित आल्टे, फ. मुं. शिंदे, विक्रम काळे,  विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, महापौर नंदकुमार घोडेले, माजी आमदार प्रदीप जैस्वाल, बाबा भांड, न्या. नरेंद्र चपळगावकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे, कुलगुरू बी. ए. चोपडे, प्र-कुलगुरू अशोक तेजनकर, प्रा. अजित दळवी, जे. के. नारायणे, रतनकुमार पंडागळे,  कृष्णा बनकर, प्रा. राम बाहेती, अण्णा खंदारे, मिलिंद दाभाडे, प्रा. सुनील मगरे, बाबा तायडे, अ‍ॅड. रमेशभाई खंडागळे, अ‍ॅड. नानासाहेब शिंदे, राजू शिंदे, दौलत मोरे, दौलत खरात आदी या वेळी उपस्थित होते.

सल्लागार, मित्र गमावला : आठवले

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सल्लागार, एक सच्चा मित्र आज गमावला आहे, अशा शब्दांत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी पद्मश्री डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. मंगळवारी सायंकाळी ते डॉ. पानतावणे यांच्या निवासस्थानी आले. त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, डॉ. पानतावणे यांच्या आकस्मिक निधनाने आंबेडकरी चळवळीची मोठी हानी झाली आहे. रिपाइं चळवळीला त्यांचे नेहमीच सहकार्य होतेे. ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत म्हणून महाराष्ट्रासह संपूर्ण देशात त्यांचा नावलौकिक होता. त्यांच्याशी माझे घनिष्ट संबंध होते. अनेक राजकीय निर्णय घेताना त्यांचा सल्ला मला उपयुक्त ठरत असे. ‘अस्मितादर्श’ या नियतकालिकामध्ये डॉ. पानतावणे यांनी माझी कवितादेखील प्रसिद्ध केली होती. ज्येष्ठ विचारवंत आणि वैचारिक पार्श्‍वभूमी विचारात घेऊन मी पद्मश्रीसाठी त्यांच्या नावाची शिफारस केली होती.  त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला, मात्र आजारपणामुळे ते राष्ट्रपती भवनमध्ये पद्मश्री स्वीकारण्यासाठी उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांचे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी साहित्यिकांनी प्रयत्न करावे. 

महाराष्ट्रातील तीन पिढ्या त्यांनी घडवल्या ः कसबे 

डॉ. पानतावणे यांचे माझ्या आयुष्यात अतिशय मोलाचे स्थान होते. चार वर्षे मला त्यांचा सहवास लाभला. डॉ. पानतावणे यांनी महाराष्ट्रातील तीन पिढ्या घडवल्या. मराठी साहित्यात त्यांनी दलित साहित्याचा प्रवाह आणला, तो जागतिक स्तरावर नेला. त्यांच्या जाण्याने माझ्या अस्तित्वातील एक भाग गळून पडला. उद्याच्या येणार्‍या साहित्यिक आणि समीक्षकांना डॉ. पानतावणे यांच्या कार्याची दखल घ्यावीच लागेल. त्यांचे कार्य अग्रस्थानी असेल. 


  •