Thu, Apr 25, 2019 15:46होमपेज › Aurangabad › ‘आंबेडकरी चळवळीतील  कार्यकर्त्यांना मुक्‍त करा’

‘आंबेडकरी चळवळीतील  कार्यकर्त्यांना मुक्‍त करा’

Published On: Jun 11 2018 12:39AM | Last Updated: Jun 11 2018 12:22AMऔरंगाबाद ः प्रतिनिधी

भीमा कोरेगाव प्रकरणात एकबोटे व भिडे यांना वाचवण्यासाठी एल्गार परिषदेच्या कार्यकर्त्यांचे अटक सत्र सुरू आहे. या प्रकरणी अटक केलेल्या कार्यकर्त्यांची तत्काळ मुक्‍तता करावी, तसेच भीमा कोरेगाव प्रकरणाची चौकशी करणार्‍या समितीला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी दलित अत्याचारविरोधी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे. 

भीमा कोरेगाव दंगलीत सहभागी असल्याचा एकही पुरावा नसताना एल्गार परिषदेच्या सुधीर ढवळे व अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग यांना अटक करण्यात आली आहे. भिडे-एकबोटेंना मदत करण्यासाठीच सरकार हा डाव खेळत आहे. तसेच भीमा कोरेगाव प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीला केवळ 30 दिवसांची मुदत दिली आहे. या प्रकरणाची गंभीरता पाहता 30 दिवसांत संबंधितांकडून कागदपत्रे पुरावे आयोगाकडे पाठवणे शक्य नसल्याने या समितीला मुदतवाढ द्यावी अशीही मागणी निवेदनात केली आहे. 

आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना अटक करून दंगलीत सहभागी असलेल्यांना सरकार मदत करत आहे. जे दंगलीत सहभागी होते त्यांच्यावरच कारवाई करावी अन्यथा याच्या प्रतिक्रिया गंंभीर उमटतील असा इशारा संघर्ष समितीचे अ‍ॅड. बी. एच. गायकवाड, कॉ. भीमराव बनसोड, मेजर सुखदेव बन, बुद्धप्रिय कबीर, कॉ. सांडू जाधव, कबीरानंद राजहंस, प्रा. भारत सिरसाठ, उदय रगडे, माधव बनकर, शेख खुर्रम, विनोद झारे, अर्जुन आडवे, पंडित नरवडे, उदय सोनवणे आदींनी दिला आहे.