Thu, Aug 22, 2019 12:29होमपेज › Aurangabad › एजंट निघाला ट्रॅक्टरचोर

एजंट निघाला ट्रॅक्टरचोर

Published On: Mar 20 2018 1:47AM | Last Updated: Mar 20 2018 1:47AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

फायनान्स कंपनीने ओढून आणलेले ट्रॅक्टर असल्याची थाप मारून ते विक्री करणारे रॅकेट गुन्हे शाखेने उघड केले. विशेष म्हणजे, एजंटगिरी करणारा वायाळ पाटील हाच ट्रॅक्टरचोर असल्याचेही समोर आले आहे. सोमवारी ट्रॅक्टर जप्त करून पोलिसांनी त्याला अटक केली.

भगवान विष्णू वायाळ (26, रा. कासलीवाल मार्बल, बीड बायपास) असे अटकेतील आरोपीचे नाव असून त्याला दौलताबाद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहापूर बंजर येथील शेतकरी जगन्‍नाथ काशिनाथ रहाणे यांचे ट्रॅक्टर (क्र. एमएच 20, सीआर 2233) नांगरणी अवजारासह 3 मार्च रोजी चोरट्यांनी पळविले होते. या प्रकरणी दौलताबाद ठाण्यात गुन्हा नोंद आहे. त्याचा तपास करताना गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल यांना खबर्‍याकडून ट्रॅक्टर धुळे जिल्ह्यातील होरपाडे येथे असल्याची माहिती मिळाली. त्यावरून गुन्हे शाखेच्या पथकाने होरपाडे येथे जाऊन पाहणी केली. तेथे पोपट कठाळे या शेतकर्‍याकडे ट्रॅक्टर मिळून आले. ट्रॅक्टरबाबत अधिक विचारपूस केली असता त्याने दोन लाख 71 हजार रुपयांत औरंगाबाद येथील वायाळ पाटील एजंटकडून विकत घेतल्याचे सांगितले. तसेच एक लाख 10 हजार रुपये दिलेले असून ट्रॅक्टर नावावर झाल्यानंतर उर्वरित रक्‍कम देण्याचे ठरल्याबाबत सांगितले. फायनान्स कंपनीने ओढून आणलेले ट्रॅक्टर असल्याचे सांगून त्याने हे विक्री केल्याचेही कठाळे यांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांना शंका आल्याने त्यांनी ट्रॅक्टर जप्त करून औरंगाबादेत आणले. तेथून पुढे तपासाला खरी गती मिळाली.

अन् एजंट रेकॉर्डवरचा गुन्हेगार

ट्रॅक्टर जप्त केल्यावर गुन्हे शाखेने एजंटचा शोध सुरू केला. त्याचे नाव भगवान विष्णू वायाळ असल्याचे समजल्यावर तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे लक्षात आले. त्यामुळे पोलिस वायाळपर्यंत पोहोचले. वायाळला ताब्यात घेऊन खाक्या दाखविताच त्याने चोरीची कबुली दिली. ही कामगिरी पोलिस निरीक्षक शिवाजी कांबळे, सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल, हवालदार शिवाजी झिने, पोलिस नाईक विलास वाघ, राजेंद्र साळुंके, कॉन्स्टेबल गजानन मांटे, विलास सोनवणे, प्रभाकर राऊत, सुनील धात्रत, देवचंद महेर, रवी दाभाडे यांनी केली.