Fri, Apr 26, 2019 15:19होमपेज › Aurangabad › विवानच्या अचाट स्मरणशक्तीने सर्व थक्क

विवानच्या अचाट स्मरणशक्तीने सर्व थक्क

Published On: Dec 17 2017 2:12AM | Last Updated: Dec 17 2017 1:51AM

बुकमार्क करा

परभणी ः बालासाहेब काळे
येथील अवघ्या साडेचार वर्षांच्या विवान अमोलकुमार सोनी या बालकाने आपल्या अचाट स्मरणशक्ती व तल्लख बुद्धिमत्तेने सर्वांनाच थक्क केले आहे. खेळण्या-बागडण्याच्या वयातील विवानची ही कामगिरी विशेष कौतुकाचा विषय बनली आहे.

एकत्र कुटुंब पद्धतीने राहणार्‍या सोनी परिवारात 9 जुलै 2013 रोजी जन्मलेला विवान हा अतिशय तीक्ष्ण बुद्धिमत्तेचा असून तो सर्वांच्या कौतुकास पात्र ठरत आहे त्याच्या स्मरणशक्तीमुळेच! एखाद्या प्रश्‍नाची माहिती इंटरनेटद्वारे मिळवायला साधारणतः दोन मिनिटे लागतात तर त्याच विषयावरच्या प्रश्‍नाचे उत्तर विवान प्रश्‍न संपताच देतो. विवान शहरातील पोदार जम्बो कीडस् स्कूलमध्ये ज्युनिअर के.जी. वर्गात शिकतो. त्याला लिहायला आणि वाचायला येते. त्याचे 91 वर्षीय पणजोबा घनशामदास सोनी, पणजी शोभा सोनी आणि आजोबा अ‍ॅड. अशोक सोनी व आजी ऊर्मिला सोनी, वडील अस्थिरोगतज्ञ डॉ.अमोलकुमार, आई डॉ.आरजू सोनी यांना तो दिवसभर वाट्टेल ते प्रश्‍न विचारत असतो. त्या प्रश्‍नाचे उत्तर मिळताच, ते त्याच्या लक्षात राहते.

विवानला जगातील सुमारे 53 देशांची व त्यांच्या राजधान्यांची नावे, भारतातील 29 राज्ये व राजधान्यांची नावे, 7 केंद्रशासित प्रदेश, भारताचे मंत्रिमंडळ, ग्रह व तार्‍यांची नावे, पंतप्रधानांसह सर्व मंत्र्यांची खातेनिहाय नावे या तपशिलांची अचू?क माहिती आहे. देशसेवेसाठी दिले जाणारे सर्वात मोठे चक्र कोणते, ते कोणाला प्रदान केले जाते, क्रिकेट संघाची नावे व त्यांचे कर्णधार कोण, जगातील सर्वाधिक क्षेत्रफळाचा देश कोणता, कोणत्या देशाची लोकसंख्या सर्वाधिक आहे, जगातले सर्वात मोठे-छोटे बेट कोणते, छोटे कोणते यासह भारताच्या प्राचीन इतिहासातल्या प्रमुख घटनाही तो अचूकपणे सांगतो. गायत्रीमंत्र, आरती, श्री हनुमानचालिसा त्याला मुखोद्गत आहे. त्याला मराठी, हिंदी, इंग्रजी, मारवाडी भाषा येतात.

वयाच्या दुसर्‍या वर्षानंतर विवान बोलू लागला
विवानला 2 वर्षे पूर्ण होईपर्यंत तो अजिबात बोलत नव्हता. त्यामुळे सुरुवातीला पालकांना काळजी वाटत होती. नंतर तो बोलायला लागल्यावर त्याची स्मरणशक्ती दांडगी असल्याचे वडीलांच्या लक्षात आले. तेव्हापासून त्यांनी नवनवीन विषय त्याला शिकवण्यास सुरुवात केली. ग्रहणशक्तीनुसार योग्य मार्गदर्शन करून त्याच्यातील गुण विकसित करणार असल्याचे डॉ. सोनी यांनी सांगितले.