Tue, Mar 26, 2019 20:02होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : पहिल्या दिवशीच शाळेला टाळे

औरंगाबाद : पहिल्या दिवशीच शाळेला टाळे

Published On: Jun 15 2018 5:43PM | Last Updated: Jun 15 2018 5:43PMवरठाण : प्रतिनीधी

अनेक शाळांमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तक तसेच पुष्पगुच्छ किंवा गावात वाजत गाजत मिरवणुक करुन विद्यार्थ्यांचे स्वागत केले जाते, पंरतु बोरमाळतांडा (ता सोयगाव ) येथे उलट प्रकार घडला आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी शिक्षकाचे रिक्त पदे भरण्याच्या मागणीवरुन ग्रामस्यांनी शाळेला कुलूप ठोकण्याचा प्रकार बोरमाळतांडा येथे शुक्रवार सकाळी घडला. या प्रकारामुळे शाळेला आलेल्या विद्यार्थ्यांना पुन्‍हा घरचा रस्‍ता धरावा लागला .

बोरमाळतांडा हे गाव घाटनांद्रा घाटाच्या पायथ्याशी वसलेले असून या गावात बंजारा समाज आहे. या येथे तांडावस्ती आहे. या ठिकाणी पहिली ते आठवीपर्यंत शाळा आहे. या शाळेची पटसंख्या पटसंख्या २८५ आहे. शाळेत सात शिक्षक कार्यरत होते, मात्र सुट्टीच्या कालावधीनंतर अनेक शिक्षक कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.येथे सात शिक्षक कार्यरत होते. बोरमाळतांडा शाळेतील तीन शिक्षकांच्या बदल्या झाल्याने या ठिकाणी सध्या मुख्याध्यापकासह चार शिक्षक कार्यरत असुन पहिली ते आठवीपर्यंतच्या वर्गांना फक्त चार शिक्षक आहेत. यामुळे एका शिक्षकास दोन वर्ग सांभाळण्याची वेळ आली आहे. शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शैक्षणिक नुकसान होत असल्याने ६ जून रोजी ग्रामपंचायत कार्यालयात समन्वय सभा घेण्यात आली होती, त्यावेळी ग्रामस्यांनी शिक्षकांचे रिक्त पदे भरण्याचा विषय घेण्यात आला. त्यावरुन सोयगावचे गटशिक्षण अधिकारी व शिक्षण अधिकारी औरंगाबाद यांना ११ जून रोजी लेखी निवेदन देण्यात आले. निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे की, बोरमाळतांडा शाळेतील शिक्षकांचे रिक्त पदे भरले गेले नाही तर ग्रामस्‍थांच्यावतीने शाळेला टाळे ठोकरणार असल्याचा इशारा देण्यात आला होता.

शिक्षण विभागाने निवेदनाचा विचार न केल्याने ग्रामस्‍थांनी पहिल्याच दिवशी शाळेला टाळे ठोकले. रिक्‍त पदे जोपर्यंत भरण्यात येणार नाहीत तोपर्यंत शाळा उघडणार नसल्याचा निर्णय ग्रामस्‍थांनी घेतला आहे. यावेळी  शालेय समिती अध्यक्ष राजाराम राठोड, उपाध्यक्ष नारायन खिल्लारे, तंटामुक्त अध्यक्ष कारभारी दागोडे, सदाशिव राठोड, उपसरपंच पंडीत राठोड, सदस्य नाना साबळे, हिरालाल चव्हाण, नितीन कोलते, बद्रीनाथ जाधव, बाळू गोरे, ईदलसिंग राठोड, ताराचंद पवार, तुळशीराम साबळे, प्रकाश पवार, बाळू काटकर, गजानन चव्हाण, राजाराम जाधव, ताराचंद पवार आदी ग्रामस्य यावेळी उपस्यित होते.

शाळेतील शिक्षकांच्या रिक्‍त पदाबाबत वेळोवेळी निवेदन देण्यात आली होती मात्र याकडे शासनाने दुर्लक्ष केले. आता तीन शिक्षकांच्या बदल्या झाल्याने व रिक्‍त पदे न भरल्याने कुलूप ठोकण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सदाशिव राठोड यांनी सांगितले.

केंद्रप्रमुख आर. बी. यांनी ग्रामस्‍थांची भेट घेतली मात्र शिक्षक भरती केल्याशिवाय शाळा उघडणार नसल्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. याबाबत वरिष्ठांशी चर्चा केली असल्याचे त्यांनी सांगितले.