Sat, Feb 16, 2019 21:49होमपेज › Aurangabad › वरुणराजाने डोळे वटारले; शेतकरी चिंतेत

वरुणराजाने डोळे वटारले; शेतकरी चिंतेत

Published On: Jun 15 2018 1:03AM | Last Updated: Jun 15 2018 12:33AMवाळूज : प्रतिनिधी

वाळूजसह परिसरात प्रांरभीच्या रोहिणी नक्षत्रात दोन वेळेला जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या, मात्र वरुणराजाने डोळे वटारल्याने शेतकर्‍यांना काळजीने घेरले आहे. मृग नक्षत्र सुरू होऊन आठवडा उलटला तरीही परिसरात पावसाचा पत्ता नाही, या चिंतेने शेतकरी बैचेन झाले आहेत.

यंदा वरुणराजा जोरदार पाऊस देणार या वल्गना फोल ठरतात की काय? असे वाळूज भागातील शेतकर्‍यांना वाटू लागले आहे. वाळूजसह परिसरात 1 व 2 मे रोजी जोरदार पाऊस झाला. त्यानंतरच्या मृग नक्षत्राने दगा दिल्याने शेतकरी हतबल आहेत. सध्या तर या भागात अक्षरश: पुन्हा नव्याने उष्णतेचा पारा वाढला असून वरुणराजा दडी मारून बसला आहे. त्यामुळे पाणीटंचाईसह खरिपाच्या पेरण्यांची समस्या शेतकर्‍यांसमोर उभी आहे. शेतीची मशागत करून कापूस, तूर, मका, मूग आदी पिकांसाठी शेतकर्‍यांनी सर्‍या पाडून ठेवल्या आहे, तर काही भागांत धूळपेरणी करण्यात आली आहे. 

बियाणे व खते शेतकर्‍यांनी खरेदी करून ठेवली आहे, मात्र लागवडीयोग्य पाऊस पडला नसल्याने अनेकांची चिंता वाढली आहे. पाऊस लांबणीवर पडल्याने आजही वाळूजसह परिसरातील जिकठाण, तुर्काबाद खराडी, धामोरी, गुरूधानोरा, शेंदुरवादा, येसगाव, टेंभापुरी, दहेगाव बंगला आदी गावांत पाणीटंचाई सुरूच आहे.