Sat, Jul 20, 2019 23:51होमपेज › Aurangabad › बोंडअळीग्रस्त शेतकर्‍यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

बोंडअळीग्रस्त शेतकर्‍यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

Published On: Feb 15 2018 1:55AM | Last Updated: Feb 15 2018 1:45AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी हिवाळी अधिवेशनात बोंडअळीग्रस्त शेतकर्‍यांना मदत जाहीर केली होती. मात्र तीन महिने उलटूनही अद्यापपर्यंत शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे गंगापूर तालुक्यातील शेतकर्‍यांनी बुधवारी (दि. 14) कृषी सहसंचालक कार्यालयासमोर मोर्चा काढून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्वरित कारवाई करून आंदोलनकर्त्यांना अटक केली.

बोंडअळीग्रस्त बागायतीला हेक्टरी 37 हजार पाचशे रुपये व कोरडवाहू शेतकर्‍यांना 30 हजार 800 रुपये मदत दिली जाणार होती. मात्र हिवाळी अधिवेशन होऊन तीन महिने होत आले, तरीही शेतकर्‍यांना अद्यापपर्यंत मदत मिळाली नाही. यासंदर्भात शेतकर्‍यांनी कृषी विभागास निवेदनेही दिली होती. मात्र प्रशासनाने त्याची कोणतीही दखल घेतली नाही. आठवडाभरात खात्यावर रक्कम जमा झाली नाही तर आत्मदहनाचा इशाराही शेतकर्‍यांनी दिला होता. बोंडअळीची नुकसानभरपाई न मिळाल्यामुळे संतप्त शेतकर्‍यांनी अखेर बुधवारी आंदोलन केले.

दुपारी एक वाजेच्या दरम्यान 50-60 शेतकरी सरकारविरोधात जोरदार घोषणा देत कृषी सहसंचालक कार्यालयासमोर गेले. यावेळी पोलिसांनी त्यांना कार्यालयात जाण्यास बंदी घातली. त्यावेळी आंदोलकांनी बाटलीमध्ये आणलेले रॉकेल अंगावर ओतून घेतले. पोलिसांनी सर्व आंदोलकांना अटक करून  ठाण्यात आणले. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य संतोष जाधव, शेतकरी रामचंद्र जगताप, सुभाष जगताप, भाऊराव लोहकरे, राजेंद्र तिखे, भाऊराव लोहकरे सह जिल्हाभरातील साठ शेतकर्‍यांची उपस्थिती होती.