होमपेज › Aurangabad › अभूतपूर्व उत्साहात शिवजयंती

अभूतपूर्व उत्साहात शिवजयंती

Published On: Feb 20 2018 1:53AM | Last Updated: Feb 20 2018 1:35AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

शिवजयंतीचा औरंगाबादेत अभूतपूर्व असाच उत्साह अन् जल्लोश पाहायला मिळाला. हाती भगव्या पताका घेऊन जयभवानी... जय शिवाजी...! चा जयघोष करीत रस्त्यारस्त्यांवर निघालेल्या रॅली, ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या मिरवणुकांमुळे अख्खे शहर ‘शिवमय’ झाले होते. क्रांती चौकात छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत उसळलेली शिवप्रेमींची गर्दी अभूतपूर्व अशीच होती. शहरातून सायंकाळी निघालेल्या मिरवणुकाही लक्षवेधी ठरल्या. 

सकाळपासूनच शहराच्या विविध भागांतून मिरवणुका, शिवभक्‍तांच्या रॅली, जत्थे क्रांती चौकात दाखल होत होत्या. सायंकाळनंतर तर क्रांती चौक परिसरात पाय ठेवायलाही जागा शिल्लक नव्हती. तरुणाईचा उत्साह शिगेला पोहोचला होता. एमआयटी, एमजीएम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या मिरवणुका लक्षवेधी ठरल्या.

मराठा क्रांती मोर्चा, जिल्हा शिवजयंती महोत्सव समिती, अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे शिवभक्‍तांच्या स्वागतासाठी तीन मंच उभारले होते. रणसंग्राम ढोलपथक, जिल्हा समितीचे ऑर्केस्ट्रा आणि मराठा महासंघाने उपलब्ध केलेल्या डॉल्बीच्या शिवगीतांवर बेफाम होऊन नृत्य केले. ‘जय जिजाऊ, जय शिवराय’च्या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ची गगनभेदी ललकारी अंगावर शहारा आणत होती. क्रांती चौक परिसरात अनोखे चैतन्य संचारले होते.

पारंपरिक पोषाख अन्..

शिवजयंतीनिमित्त अभिवादनासह आपल्या राजाबद्दल असलेले प्रेम आणि आदर व्यक्‍त करण्यासाठी तमाम शिवभक्‍तांनी क्रांती चौकात गर्दी केली होती. तरुणाईचा उत्साह शिगेला होता. हातात शिवध्वज, भगवे जॅकेट, कुर्ता आणि फेटे बांधलेल्या युवकांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. मात्र, यात आबालवृद्ध पुरुषांसह महिलाही मागे नव्हत्या. अनेकांनी आराध्य दैवताच्या दर्शनाप्रमाणे शिवरायांच्या अभिवादनासाठी अनेक दाम्पत्यांनी जोडीने हजेरी लावली. नऊवारी, नाकात नथ आणि डोक्यावर भगवा फेटा, अशा पारंपरिक पेहरावात महिला आल्या होत्या. अशीच नऊवारी नेसून शिवजन्मोत्सवात सहभागी एक चिमुकली सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.

शंभर फुटांची प्रतिमा...

सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती मयूर पार्क यांच्यातर्फे, जळगाव रोडलगत असलेल्या मयूर पार्क चौकात 15 बाय 100 फूट उंचीचे शिवरायांचे बॅनर लावण्यात आले होते. विशेब बाब म्हणजे या परिसरातून ये-जा करणार्‍या नागरिकांना क्षणभर विश्रांती घेऊन राजेंच्या प्रतिमेस अभिवादन करण्याचा मोह काही आवरता आला नसावा.