Fri, Apr 26, 2019 20:05होमपेज › Aurangabad › शासकीय अभियांत्रिकीत गुणांची अदलाबदल

शासकीय अभियांत्रिकीत गुणांची अदलाबदल

Published On: Mar 24 2018 2:13AM | Last Updated: Mar 24 2018 1:57AMऔरंगाबाद : गजेंद्र बिराजदार

कॉपीपेस्ट करताना सतर्कता न बाळगल्यास काय घडू शकते याचा भयंकर अनुभव शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने घेतला. एम. ई. इलेक्ट्रीकल प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची गुणतालिका तयार करताना गुण एक रकाना सुटून कॉपीपेस्ट झाले. त्यामुळे गुणांची अदलाबदल होऊन उत्तीर्ण विद्यार्थिनी अनुत्तीर्ण तर अनुत्तीर्ण विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचा प्रकार घडला. 

स्वायत्त असल्यामुळे प्रवेशापासून परीक्षेपर्यंत सर्वकाही महाविद्यालयातच होते. महाविद्यालयाचा स्वतंत्र परीक्षा विभाग आहे. एम.ई. इलेक्ट्रीकल पॉवर सिस्टीम प्रथम वर्षाला 16 विद्यार्थी आहेत. त्यांच्या परीक्षेचा निकाल 25 जानेवारी रोजी जाहीर झाला. ग्रेडिंग पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना ते उत्तीर्ण की अनुत्तीर्ण त्याचप्रमाणे किती ग्रेड मिळाले हे समजले. एका अनुत्तीर्ण विद्यार्थिनीला निकालाबाबत शंका आली. त्यामुळे तिने फेरमूल्यांकनासाठी अर्ज केला. फेरमूल्यांकनादरम्यान पॉवर सिस्टीम प्लॅनिंग अ‍ॅण्ड ऑपरेशन अ‍ॅण्ड कंट्रोल या पेपरमध्ये ती उत्तीर्ण असल्याचे आढळले. या पेपरमध्ये तिला जेव्हढे गुण मिळाले होते तेव्हढे गुण गुणतालिकेवर दिसत नव्हते. त्यामुळे परीक्षा विभागाने सर्वच विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांवरील गुण आणि तालिकेवरील गुण यांची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा विद्यार्थ्यांच्या गुणांची अदलाबदल झाल्याचे आढळून आले. 

कुठे झाली गफलत : महाविद्यालयाने परीक्षेच्या कामासाठी एमआयएस हे सॉफ्टवेअर घेतले आहे. विद्यार्थ्यांच्या गुणांची त्यात डाटा एन्ट्री करण्यात आली होती. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे हे सॉफ्टवेअर कार्यान्वित होऊ न शकल्यामुळे गुणतालिका मॅन्युअली तयार करणे भाग होते. त्यासाठी डाटा एन्ट्री केलेले गुण कॉपी करून एक्सेलवर घेण्यात आले. मात्र, ते पेस्ट करताना एक रकाना हुकला. त्यामुळे ज्या परीक्षार्थीपासून गुण पेस्ट होणार होते त्याच्या पुढील परीक्षार्थीपासून ते पेस्ट होत गेले आणि त्यामुळे याचे गुण त्याला आणि त्याचे गुण याला असा प्रकार घडला. 

चार चाळण्यानंतरही चूक

गुणांची आधी डाटा एन्ट्री होते. त्यानंतर डाटा व्हेरिफिकेशन केले जाते. त्यानंतर संबंधित विभागाचे प्राध्यापक आणि सहायक परीक्षा नियंत्रक डाटाची पडताळणी करतात. डाटा एन्ट्रीपासून गुणतालिका तयार होईपर्यंत चार चाळण्या आहेत. याउपरही हा घोळ झाल्याने आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे. दरम्यान, चूक लक्षात आल्यानंतर गुण दुरुस्त करण्यात आले. अनुत्तीर्ण असताना उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याला याची कल्पना देण्यात आली. त्याने ही बाब स्वीकारत सुधारित निकाल स्वीकारला एवढेच नाही तर राहिलेला पेपर पुन्हा देण्यासाठी परीक्षा अर्जही भरला.

Tags : Aurangabad, Aurangabad News, exchanging, first year, engineering, student marks