Mon, May 20, 2019 18:05होमपेज › Aurangabad › परीक्षा विभागाचे आता ताकही फुंकून

परीक्षा विभागाचे आता ताकही फुंकून

Published On: Feb 19 2018 1:24AM | Last Updated: Feb 19 2018 1:24AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

दूध पोळले की ताकही फुंकून प्यावे लागते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा परीक्षा विभाग सध्या हेच करत आहे. पदवी परीक्षेच्या गेल्या सत्रात आसनव्यवस्थेचे नियोजन चुकल्यामुळे ऐनवेळी परीक्षा केंद्रे बदलावी लागली होती. परीक्षा केंद्रांवर गेल्यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलल्याचे समजले. नवे परीक्षा केंद्र शोधताना त्यांची त्रेधातिरपीट उडाली होती. काही विद्यार्थ्यांना भारतीय बैठक मारून तर काहींना चक्‍क गोदामात पेपर सोडवावा लागला होता. 

मार्चच्या परीक्षेत याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून परीक्षा विभाग जपून पावले टाकत आहे. आम्ही महाविद्यालयांची विद्यार्थी संख्या मागवली आहे. त्यानुसार आम्ही तेथे तेव्हढ्याच परीक्षार्थींची बैठक व्यवस्था करणार आहोत, असे परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके यांनी सांगितले. 

परीक्षा मंडळाची 28 ला बैठक : कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि.28) परीक्षा मंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत मार्च-एप्रिलच्या परीक्षेचे वेळापत्रक निश्‍चित करण्यासह परीक्षा केंद्रांना परवानगी दिली जाणार आहे. याशिवाय परीक्षा कडक बंदोबस्तात घेण्यासाठी सहकेंद्रप्रमुखांची नियुक्‍ती करण्यात येईल. दोन ते तीन महाविद्यालयांनी परीक्षा केंद्र देण्याची मागणी केली आहे. त्यावर बैठकीत विचार होईल, असेही नेटके म्हणाले.  

600 विद्यार्थ्यांवर डब्ल्यूपीसी कारवाई  नोव्हेंबर-डिसेंबरमधील परीक्षेत कॉपी केलेल्या 600 विद्यार्थ्यांवर संपूर्ण निकाल रद्दची (डब्ल्यूपीसी) कारवाई करण्यात आली आहे. औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यात पदवी आणि पदव्युत्तरच्या परीक्षेत 605 विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडण्यात आले होते. या विद्यार्थ्यांची सुनावणी घेऊन त्यांना संपूर्ण विषयात अनुत्तीर्ण करण्यात आले.