Tue, Jun 18, 2019 23:11होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : दर दोन महिन्यांनी बदलल्या जायच्या तरुणी!

औरंगाबाद : दर दोन महिन्यांनी बदलल्या जायच्या तरुणी!

Published On: Dec 10 2017 1:18AM | Last Updated: Dec 10 2017 1:18AM

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

प्रोझोन मॉलमधील ‘अनंतरा व दी स्ट्रेस हब’ या दोन्ही ‘स्पा’मध्ये देहविक्रीसाठी येणार्‍या तरुणी दर दोन महिन्यांनी बदलल्या जात होत्या. विशेष म्हणजे या आंतरराष्ट्रीय देहविक्री अड्ड्याचा सूत्रधार ‘स्पा’चा मुंबईत बसलेला मालकच असल्याचे आता तपासात समोर आले आहे. हा मालकच मुंबईहून दर दोन महिन्यांनी नव्या विदेशी तरुणी येथे देहविक्रीसाठी पाठवायचा. खुद्द या ‘स्पा’च्या व्यवस्थापकाने चौकशीत ही माहिती पोलिसांना दिल्याचे सूत्रांनी सांतिले. आता पोलिसांनी ‘त्या’ मालकाचा शोध सुरू केला आहे.

औरंगाबादच्या पोलिस उपायुक्‍त डॉ. दीपाली धाटे-घाडगे व त्यांच्या विशेष पथकाने खबर्‍यांकडून मिळालेल्या माहितीवरून गुरुवारी मराठवाड्यातील नामांकित व सर्वांत मोठ्या प्रोझोन मॉलमध्ये ‘अनंतरा व दी ट्रेस हब’ या दोन्ही ‘स्पा’मध्ये मसाज व कटिंगच्या नावाखाली सुरू असलेल्या या आंतरराष्ट्रीय देहविक्री व्यापाराचा पर्दाफाश केला होता. या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे. या अड्ड्यावरून सिडको एमआयडीसी पोलिसांनी देहविक्री करणार्‍या थायलंड देशाच्या नऊ व दोन स्थानिक तरुणी, तसेच ‘स्पा’चा मुख्य व्यवस्थापक शशांक यशदीप खन्ना (रा. मालाड, मुंबई) याच्यासह या कृत्यात सहभागी असलेले ‘स्पा’चे कर्मचारी सुनील कचरू नवतुरे (27, रा. मिसारवाडी), शेख तौफिक शेख अफसर (23, रा. बायजीपुरा, संजयनगर), राहुल माणिकराव नलावडे (28, रा. मिसारवाडी) आणि ग्राहक प्रदीप शंकरलाल शर्मा (52, रा. पवननगर, टीव्ही सेंटर), रोहन राजेंद्र कुलकर्णी (26, रा. रिलायन्स पंपाजवळ, सिडको), अकीब अक्रम खान पटेल (23, रा. उस्मानपुरा) व इराकी विद्यार्थी येमेन अब्दुल हमीद जासेम यांना रंगेहाथ अटक केली होती. या ‘स्पा’च्या गल्ल्यातून पोलिसांनी तब्बल साडेआठ लाख रुपये रोख रक्‍कमही जप्त केली होती. 

दरवेळी नवीन मुली मिळाव्यात म्हणून...

विशेष म्हणजे आपल्याकडे एकदा आलेला ग्राहक सतत यावा, यासाठी ‘स्पा’ने विशेष काळजी घेतलेली होती. येथे दर दोन महिन्यांनी मुली बदलल्या जात होत्या. मुंबईत बसलेला या ‘स्पा’चा मालक डेरेक मछोडा हाच याचा मुख्य सूत्रधार असल्याची माहिती अटकेत असलेल्या ‘स्पा’च्या व्यवस्थापकाने दिल्याचे सूत्रांनी सांगितले. हा मालक दोन महिन्यांनी मुंबईहून दुसर्‍या मुली पाठवायचा आणि आधीच्या मुली मुंबईला बोलावून घेऊन त्यांना आपल्या दुसर्‍या अड्ड्यावर पाठवित होता. या रॅकेटमध्ये विदेशी मुलींबरोबरच विविध राज्यांच्या व स्थानिक तरुणींचाही सहभाग होता, असे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले आहे. आता ‘स्पा’मालकाचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. 

संबंधित बातम्या :

सेक्स रॅकेटः सलूनचा एका दिवसाचा गल्ला दहा लाख रुपये!

अधिकारी, व्हीआयपींची ‘स्पा’ला असायची हजेरी!

औरंगाबाद : आंतरराष्ट्रीय देहव्यापाराचा पर्दाफाश