होमपेज › Aurangabad › पन्नास अधिकारी-कर्मचार्‍यांनी दिली मराठी भाषा परीक्षा

पन्नास अधिकारी-कर्मचार्‍यांनी दिली मराठी भाषा परीक्षा

Published On: Feb 27 2018 2:20AM | Last Updated: Feb 27 2018 2:12AMऔरंगाबाद  : रवी माताडे 

सरकारी कार्यालयांमध्ये काम करणार्‍या अधिकारी-कर्मचार्‍यांना मराठी भाषेचे ज्ञान अवगत असणे बंधनकारक आहे. शैक्षणिक अभ्यासक्रमात प्रथम भाषा म्हणून मराठी हा विषय नसलेल्या अशा अधिकारी-कर्मचार्‍यांना सरकारी नोकरीत आल्यानंतर दोन वर्षांत ही परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते. यंदा 50 अधिकारी-कर्मचार्‍यांनी ही परीक्षा दिल्याची माहिती भाषा संचालनालय कार्यालयातून मिळाली आहे. राज्यात कुठेही काम करताना, सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधता यावा, यासाठी अधिकार्‍यांना मराठी भाषा अवगत असणे बंधनकारक आहे.

दहावीची परीक्षा देताना प्रथम भाषा मराठी विषय नसलेल्या व सरकारी नोकरीत आलेल्या अधिकारी-कर्मचार्‍यांना महाराष्ट्रात मराठी भाषेची परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक आहे. सेवेत आल्यानंतर दोन वर्षांत ही परीक्षा उत्तीर्ण करावी लागते, अन्यथा त्यांची वेतनवाढ थांबवली जाते. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच त्यांना वेतनवाढी लागू केल्या जातात. विशेष म्हणजे भाषा परीक्षा उत्तीर्ण होण्यास जेवढा वेळ लागेल, त्या कालावधीतील वेतनवाढीचा एरियर्स त्यांना मिळत नाही. भाषा संचालनालय कार्यालयाकडून दरवर्षी जून आणि डिसेंबर महिन्यात ही परीक्षा घेतली जाते. राज्यभरात एकाचवेळी ही परीक्षा होते. 

परराज्यातील रहिवासी असलेले, तेथे शिक्षण पूर्ण केलेले आणि महाराष्ट्र केडरमध्ये नोकरीत आलेल्या जिल्हाधिकार्‍यापासून ते कर्मचार्‍यांपर्यंत, तसेच पोलिस, जिल्हा परिषद, सिंचन यासह विविध विभागांतील अधिकारी-कर्मचार्‍यांना ही परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. नववी व दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित ही परीक्षा असते. निबंध, पत्रलेखन, भाषांतर, एखाद्या विषयावर स्पष्टीकरण, निवेदन, परिपत्रक सादरीकरण आदी विविध मुद्याआधारे लघुलेखन, टंकलेखन आणि तोंडी परीक्षा घेतली जाते.