होमपेज › Aurangabad › रिचार्ज डिलरला नोकराने घातला 30 लाखांचा गंडा

रिचार्ज डिलरला नोकराने घातला 30 लाखांचा गंडा

Published On: Feb 19 2018 1:24AM | Last Updated: Feb 19 2018 1:24AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

बारा वर्षांपासून दुकानात कामाला असलेल्या नोकरावर अतिविश्‍वास टाकणे दुकानदाराला चांगलेच महागात पडले. खासगी मोबाइल कंपनीची रिचार्ज डिलरशीप असलेल्या दुकानातून विक्री झालेल्या व्हाउचरचे पैसे नोकराने स्वतःच्या खात्यावर घेऊन तीन महिन्यात तब्बल 29 लाख 50 हजार रुपये गायब केले. हिशेब विचारल्यावर तो पसार झाला. त्यानंतर हा प्रकार समोर आला. याप्रकरणी 17 फेब्रुवारी रोजी नोकराविरुद्ध सिडको ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला.

सुदाम नानासाहेब भांडवलकर (36, रा. टाकळी अंबड, ता. पैठण, ह. मु. कल्याणी साईविश्‍व अपार्टमेंट, सावंगी) असे आरोपी नोकराचे नाव असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक व्ही. के. झुंजारे यांनी दिली. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुधाकर भावराव धाटबळे (46, रा. दर्शना हाउसिंग सोसायटी, नवनाथनगर, एन-11, हडको) यांचे टीव्ही सेंटरजवळील संजय गांधी मार्केटमध्ये ऋषीकेश कम्युनिकेशन नावाचे दुकान आहे. त्यांच्याकडे वोडाफोनच्या रिचार्जची औरंगाबाद शहराची डिलरशीप आहे. त्यांच्या दुकानात आरोपी सुदाम भांडवलकर हा बारा वर्षांपासून कामाला आहे. त्यामुळे धाटबळे यांचा त्याच्यावर विश्‍वास होता. धाटबळे दुकानात नसले तरी भांडवलकर हा सर्व जबाबदारी सांभाळत होता. व्हाउचर प्राप्त झाल्यावर ग्राहक पैसे धाटबळे यांच्या फर्मच्या नावाने किंवा त्यांच्या खात्यात जमा करत असत. याच संधीचा गैरफायदा आरोपी सुदाम भांडवलकर याने घेतला. धाटबळे दुकानात नसताना विक्री केलेल्या रिचार्जची कधी आर्धी कधी पूर्ण रक्‍कम त्याने स्वतःच्या खात्यात भरून घेतली. 1 डिसेंबर 2017 पासून त्याचा हा प्रकार सुरू होता. 13 फेब्रुवारी रोजी धाटबळे यांनी त्याला हिशेब विचारला. त्यानंतर आरोपीला हिशेब मांडता आला नाही. यात त्याने गौडबंगाल केल्याचे स्पष्ट झाले. तसेच, तेव्हापासून तो पसार आहे. अखेर धाटबळे यांनी सिडको ठाण्यात धाव घेऊन फिर्याद नोंदविली. या प्रकरणाचा तपास सहायक निरीक्षक व्ही. के. झुंजारे करीत आहेत.

पैशासाठी स्वतःचे खाते उघडले

ग्राहकांकडून पैसे घेण्यासाठी आरोपी सुदाम भांडवलकर याने आयसीआयसीआय बँकेत स्वतःचे खाते उघडले. ग्राहकांना तो स्वतःच्या खात्यात रक्‍कम भरण्यास सांगत असे. पूर्वी हीच रक्‍कम फर्मच्या किंवा दुकानदार धाटबळे यांच्या खात्यात जमा केली होती. धाटबळे यांचे महाराष्ट्र आणि सारस्वत बँकेत खाते आहे, असे सहायक पोलिस निरीक्षक व्ही. के. झुंजारे यांनी सांगितले.