Fri, Apr 26, 2019 09:59होमपेज › Aurangabad › इज्तेमासाठी चार हजार पोलिसांचा बंदोबस्त

इज्तेमासाठी चार हजार पोलिसांचा बंदोबस्त

Published On: Feb 24 2018 1:36AM | Last Updated: Feb 24 2018 1:36AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

लिंबेजळगाव येथे होणार्‍या इज्तेमासाठी जवळपास चार हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून नऊ परिशिष्टांमध्ये हा बंदोबस्त विभागला आहे. इज्तेमाचे ठिकाण, पार्किंग, वाहतूक आदी प्रमुख ठिकाणी तगडा बंदोबस्त असून पोलिस आयुक्‍त यशस्वी यादव यांच्यासह 10 उपायुक्‍त, 23 सहायक पोलिस आयुक्‍त, 53 निरीक्षक, 208 उपनिरीक्षक व 3 हजार 700 पोलिस कर्मचारी तीन दिवस खडा पहारा देणार आहेत. याशिवाय राज्य राखीव पोलिस दलाच्या तीन कंपन्या, बॉम्बशोधक पथकाच्या 9 टीम, एटीएस, आयबी, सीआयडी, एसआयडीचे अधिकारी येथे तैनात केले आहेत. 

लिंबेजळगाव शिवारात राज्यस्तरीय इज्तेमा आयोजित करण्यात आला आहे. 24 ते 26 फेब्रुवारीदरम्यान हा धार्मिक सोहळा होणार असून देशभरातून अंदाजे 20 ते 25 लाख भाविक येणार आहेत. विशेष म्हणजे, अगदी आठ दिवसांवर हा कार्यक्रम आलेला असताना आयोजकांनी पोलिसांना याची अधिकृत माहिती दिली नव्हती. त्यामुळे पोलिस निरीक्षक सतीशकुमार टाक यांनी आयोजकांना पत्र देऊन त्यांची एकच पंचाईत केली होती. परंतु, त्यानंतर आयोजकांच्या शिष्टमंडळाने पोलिस आयुक्‍तांची भेट घेऊन सर्व अटींची पूर्तता केली.

अतिरिक्‍त महासंचालकांनी घेतला आढावा
अतिरिक्‍त महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) बिपीन बिहारी यांनी शुक्रवारी औरंगाबादेत येऊन इज्तेमाच्या बंदोबस्ताचा आढावा घेतला. इज्तेमाच्या ठिकाणाची पाहणी केली. तसेच, बॅनर फाडल्याच्या घटनेनंतर गुरुवारी शहरात झालेल्या तणावाबाबतही त्यांनी माहिती घेऊन अधिकार्‍यांना सूचना केल्या. यापुढेही शिवजयंती, होळी हे मोठे उत्सव आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होणार नाही, त्यासाठी योग्य नियोजन करणे, गुन्हेगारांवर कारवाई करणे अशा सूचना केल्या आहेत. यावेळी विशेष पोलिस महासंचालक मिलिंद भारंबे, पोलिस आयुक्‍त यशस्वी यादव, प्रभारी पोलिस अधीक्षक उज्ज्वला वनकर यांच्यासह मराठवाड्यातील सर्व पोलिस अधीक्षकांची उपस्थिती होती.