Mon, Jan 21, 2019 13:39होमपेज › Aurangabad › आठ वेळा नापास, नवव्या वेळी कॉपी पकडल्याने दिली आत्महत्येची धमकी

आठ वेळा नापास, नवव्या वेळी कॉपी पकडल्याने दिली आत्महत्येची धमकी

Published On: Apr 26 2018 1:24AM | Last Updated: Apr 26 2018 12:50AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

रफिक झकेरिया महिला महाविद्यालयात कॉपी पकडल्यामुळे आत्महत्येची धमकी देणारा विद्यार्थी बी.एड. परीक्षेत चार वर्षांपासून अनुत्तीर्ण होत आहे. परीक्षा देण्याची त्याची ही नववी वेळ होती. एकच विषय राहिला आहे. तो आता नाही निघाला तर पुन्हा सर्व विषयांची परीक्षा द्यावी लागेल, अशी भीती वाटल्यामुळे त्याने आत्महत्येची धमकी देण्याचा प्रताप केला. मात्र, त्यामुळे फायदा होण्याऐवजी त्याच्यावर मालप्रॅक्टिसची कारवाई झाली. आगीतून फुफाट्यात पडणे म्हणतात ते यालाच.  

ज्युबली पार्क येथील रफिक झकेरिया महिला महाविद्यालयात शनिवारी (दि. 21) बी.एड. उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्याची कॉपी पकडण्यात आली. तेव्हा मी 35 लाख रुपये दिले आहेत, मला पेपर लिहू द्या, नाही तर आत्महत्या करेन, असे त्याने धमकावले. एमआयटीच्या घटनेमुळे सतर्क असलेल्या प्राध्यापकांनी उत्तरपत्रिका परत देत त्याची समजूत घातली. मात्र, नंतर पोलिसांना घटनेची माहिती देऊन त्याच्यावर परीक्षेत अनुचित मार्गाचा अवलंब केल्याची कारवाई केली. या विद्यार्थ्याचा एकच विषय राहिला आहे. कसेही करून तो यावेळी निघावा असे त्याला वाटत होते. शनिवारी तो याच विषयाची परीक्षा देत होता. तेव्हा त्याची कॉपी पकडली गेली आणि पुढील प्रकार घडला, अशी माहिती कॉलेजमधील सूत्रांनी दिली. 

Tags : Aurangabad, eight, times, fail, copy, 9th time, threatens, suicide