Sat, Apr 20, 2019 16:03होमपेज › Aurangabad › मराठवाड्यातील ३ हजार ५७७, गावे दुष्काळाच्या छायेत

मराठवाड्यातील ३ हजार ५७७, गावे दुष्काळाच्या छायेत

Published On: Jan 09 2018 1:32AM | Last Updated: Jan 09 2018 12:16AM

बुकमार्क करा
औरंगाबाद : प्रतिनिधी

मराठवाड्यातील साडेआठ हजार गावांपैकी तब्बल 3 हजार 577 गावांची अंतिम पैसेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी आली आहे. यात औरंगाबाद, परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील गावांची संख्या अधिक आहे. तीन वर्षांत सर्वात दुष्काळी जिल्हे ठरलेले उस्मानाबाद, लातूरसह हिंगोली, जालना हे जिल्हे यंदा दुष्काळाच्या गर्तेतून बाहेर पडले आहेत, तर दुसरीकडे दुष्काळ घोषित करण्याचे सूत्र यंदापासून शासनाने बदलले असून, विविध विभागांच्या अभ्यासपूर्ण अहवालानंतरच त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे, त्यामुळे दुष्काळी उपाययोजनांपासून यंदा अनेक गावे वंचित राहण्याची चिन्हे आहेत. 
महसूल यंत्रणेकडून दरवर्षी 30 सप्टेंबरला हंगामी पैसेवारी जाहीर केली जाते, 31 ऑक्टोबरला सुधारित तर 31 डिसेंबरला अंतिम पैसेवारी अहवाल सादर केला जातो. पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी आल्यास, त्या जिल्ह्यात किंवा तालुक्यात दुष्काळ निवारण्याचा शेतसारा माफ, वीज बिलासह विविध वसुलीस स्थगिती, पाणीपुरवठ्यांच्या विविध उपाययोजना राबवल्या जातात. मात्र यंदा शासनाने दुष्काळ जाहीर करण्याचे निकष बदलले आहेत, तसा अध्यादेशही 7 ऑक्टोबर 2017 रोजी शासनाने काढला आहे. आता पडलेला पाऊस, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता निर्देशांक, जलविषयक निर्देशांक, पिकांचे सर्वेक्षण, परिस्थिती आदी सर्व बाबींचा विचार करावा लागणार आहे.

पावसाची आकडेवारी तपासताना, दोन पावसातील खंड (किमान 3-4 आठवड्यांचा खंड), जून, जुलै महिन्यांत सरासरीच्या 50 टक्क्यांंपेक्षा कमी तसेच जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीच्या 75 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पाऊस झाला आहे का, खरीप हंगामात झालेली एकूण पेरणीची महिनानिहाय स्थिती, मृदू आर्द्रता निर्देशांक किती आहे, जुलै ते फेब्रुवारी या महिन्यातील भूजल परिस्थिती कशी आहे, चार्‍याची उपलब्धता, पिण्याच्या पाण्याची टंचाई, रोजगाराची वाढती मागणी, लोकांचे स्थलांतरण, शेती व इतर क्षेत्रांतील मजुरीचे सरासरी दराचे प्रचलित दराशी प्रमाण, अन्नधान्याचा पुरवठा व अत्यावश्यक वस्तूंचे दर आदी माहितीचा विचार करावा लागणार आहे.

या सर्व माहितीचा अभ्यास केल्यानंतर दुष्काळाची स्थिती कशी आहे, गंभीर, मध्यम की सामान्य परिस्थिती आहे, हे ठरवले जाणार आहे. तसेच दुष्काळी परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.

पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी असलेले तालुके

औरंगाबादेतील सर्व 9 तालुक्यांतील 1 हजार 354 गावे, परभणी जिल्ह्यातील सर्व 9 तालुके 849 गावे, जालना जिल्ह्यातील जालना तालुक्यातील 151 गावांपैकी 35 गावे, नांदेडमधील 1 हजार 562 गावांपैकी 1 हजार 168 गावे (नांदेड, अर्धापूर, भोकर, मुदखेड, धर्माबाद, उमरी हे तालुके वगळून), लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील सर्वच्या सर्व 47, अहमदपूरमधील सर्व 124 गावे.