Wed, May 22, 2019 22:50होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : विद्यापीठात नामविस्तारदिनी  प्रचंड गर्दी 

औरंगाबाद : विद्यापीठात नामविस्तारदिनी  प्रचंड गर्दी 

Published On: Jan 14 2018 4:02PM | Last Updated: Jan 14 2018 4:02PM

बुकमार्क करा
औरंगाबाद : प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या २४ व्या नामविस्तार दिनानिमीत्त, विद्यापीठ गेटसमोर असलेल्या विजयस्तंभ व बाबासाहेबांच्या पुर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी रविवारी हजारोंच्या संख्येने भिमसागर उसळला होता.

सकाळी सहा वाजल्यापासूनच राज्यभरातील भिमसैनिक विद्यापीठ परिसरात दाखल झाले होते. शहरातील विविध संघटना, दलित चळवळीतील कार्यकर्ते, विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, व हजारोच्या संख्येने बौद्ध उपासक- उपासिका ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो’ असा जयघोष करून पुतळ्यास व विद्यापीठ गेट जवळील भगवान बुद्धांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. अतिशय हर्ष उत्साहात नामविस्तार दिन सोहळा साजरा झाला.

विद्यापीठ परिसरात विविध उपक्रमांची रेलचेल 

विद्यापीठ परिसरात अभिवादन करण्यासाठी हजारोच्या संख्येने भिमसागर उसळला होता. मात्र या गर्दीतही विविध संघटना, महाविद्यालयाच्या वतीने सामाजिक उपक्रम राबविले गेले. यामध्ये ‘महामाया सेवाभावी संस्था’ तर्फे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. समता कला मंचचे रामदास उन्हाळे, कुणाल गायकवाड, सोनू गायकवाड, समाधान खरे, समीक्षा मौर्य, अश्‍विनी खंदारे यांनी ‘विद्रोही शाहिरी जलसा’ चे सादरीकरण करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘मोफत पाणी वाटप’ तसेच ‘गंडे धागे दोरे मुक्त अभियान’ राबवून समाजप्रबोधन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयातर्फे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर साळवे, उपप्राचार्य डॉ. करडे, डॉ. नवनाथ गोरे, एन.सी.सी व एन.एस.एस चे स्वयंसेवकांची उपस्थिती होती. यावेळी मोठ्या संख्येने युवकांनी रक्तदान शिबीरात सहभाग घेतला होता. 

भिमशक्तीतर्फे भोजनदान

नामविस्तार दिनाच्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने बौद्ध उपासक, उपासिका विद्यापीठात दाखल झाली होती.  दूरवरून आलेल्या लोकांसाठी भिमशक्ती संघटनेतर्फे भोजनाची सोय करण्यात आली होती. या सोहळ्यात दाखल झालेल्या प्रत्येकानेच भोजनाचा आस्वाद घेतला. यावेळी भिमशक्ती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, अ‍ॅड. डी.एस. पगारे, शांतीलाल गायकवाड, बाबूराव वाकेकर, कैलास जुंबडे, मनोज वाहूळ, सचिन भाले, अनिल उबाळे यांची उपस्थिती होती. 

तगडा पोलिस बंदोबस्त

कोरेगाव-भिमा प्रकरणाच्या पाश्वभूमीवर कोणताही  अनुचित प्रकार घडू नये यासाठी विद्यापीठ परिसरात तगडा बंदोबस्त करण्यात आला होता. जागोजागी पोलिस अधिकारी, शिपाई, महिला पोलिस तैनात करण्यात आले होते. तसेच या संपुर्ण सोहळ्यावर ड्रोन कॅमेर्‍याची नजर होती.